वृत्तसंस्था, साओ पावलो

व्हिनिशियस ज्युनियरच्या निर्णायक गोलच्या जोरावर घरच्या मैदानावर झालेल्या पात्रता फेरीतील सामन्यात पॅराग्वेचा १-० असा पराभव करून ब्राझीलने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. १९३० सालापासून आतापर्यंत प्रत्येक विश्वचषकात खेळणारा ब्राझील हा एकमेव देश ठरला आहे. नवे प्रशिक्षक कार्लो अॅन्चेलॉटी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलने पहिलाच विजय मिळवला. यापूर्वी, बचावात्मक खेळामुळे ब्राझीलला इक्वेडोरविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पॅराग्वेविरुद्ध मात्र अॅन्चेलॉटी यांनी ब्राझीलच्या नैसर्गिक आक्रमकतेला पूर्ण वाव दिला. पुनरागमनवीर राफिन्हाने पॅराग्वेच्या बचाव फळीसमोर अनेक समस्या निर्माण केल्या. पॅराग्वेने व्हिनिशियसवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. यानंतरही माथियस कुनयाच्या पासवर ४४व्या मिनिटाला व्हिनिशियसने हलकासा स्पर्श करत चेंडूला गोलजाळीची दिशा दिली आणि सामन्यातील एकमेव गोल केला.

दक्षिण अमेरिका गटातील अन्य सामन्यात इक्वेडोरने पेरू संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. कोलंबियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या गतविजेत्या अर्जेंटिनाने यापूर्वीच पात्रता मिळवली आहे. उरुग्वेने घरच्या मैदानावर व्हेनेझुएलाचा २-० असा पराभव केला. त्यांना पात्रतेसाठी एका गुणाची आवश्यकता आहे. इक्वेडोर आणि ब्राझील दोघांचे २५ गुण असून, विजयांच्या आधारे इक्वेडोर दुसऱ्या, तर ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आघाडीवरील अर्जेंटिनापेक्षा १० गुणांनी मागे आहेत. पात्रता फेरीचे दोन सामने शिल्लक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिली तिसऱ्यांदा अपयशी

दक्षिण अमेरिका गटातून चिलीला पात्रता सिद्ध करण्यात अपयश आले. बोलव्हियाविरुद्ध त्यांना ०-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चिली संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. या अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक रिकोर्डो गॅरेका यांनी पदाचा राजीनामा दिला. चिलीने २०१५ आणि २०१६ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र, नंतर ते विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकले नाहीत. ‘‘इतके मोठे अपयश कधीच पाहिले नाही. चिलीच्या चाहत्यांनी आम्हाला माफ करावे,’’ अशी भावना अनुभवी खेळाडू अॅलेक्सिस सँचेझने व्यक्त केली.