झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला प्रयोगाची संधी

हरारे : पहिल्या दोन सामन्यांतील दमदार कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचे सोमवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासह मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे लक्ष्य आहे.

तुलनेने दुबळय़ा झिम्बाब्वेविरुद्ध केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपेक्षेनुसार अप्रतिम खेळ केला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांमध्ये भारताचे वर्चस्व दिसून आले. विशेषत: भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करताना झिम्बाब्वेला अनुक्रमे १८९ आणि १६१ धावांत गारद केले. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरच होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही यशस्वी कामगिरी सुरू ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आता प्रत्येक मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताला प्रयोगाची संधी आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणारा भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक असेल.

दुसरीकडे, यजमान झिम्बाब्वेचा कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: सिकंदर रझा आणि सीन विल्यम्स या अनुभवी खेळाडूंनी योगदान देणे गरजेचे आहे. गोलंदाजीत लूक जोंग्वेवर त्यांची भिस्त आहे.

राहुलच्या कामगिरीवर नजर

दुखापत आणि करोनातून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार केएल राहुलचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा प्रयत्न असेल. राहुलला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने सलामीला येण्याचा निर्णय घेतला, पण केवळ पाच चेंडूंत एक धाव करून तो माघारी परतला. आगामी आशिया चषकाच्या दृष्टीने राहुलला लय गवसणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. या सामन्यात महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळू शकेल. तसेच शिखर धवन, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांचा चांगली कामगिरी सुरू ठेवण्याचा मानस असेल.

आवेश, शाहबाझला संधी?

तिसऱ्या सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देऊन आवेश खानला संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन विचार करू शकेल. तसेच अक्षर पटेलच्या जागी डावखुरा अष्टपैलू शाहबाझ अहमदला संघात स्थान मिळू शकेल. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर शाहबाझचा भारतीय चमूत समावेश करण्यात आला होता. आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या दीपक चहरला दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, त्याचे अखेरच्या सामन्यासाठी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे

* वेळ : दुपारी १२.४५ वा. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३, ४