इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील सलामीच्या लढतीसाठीच्या खेळपट्टीची बरीच चर्चा झाली. याच चेपॉक स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील दुसऱ्या लढतीसंदर्भातही खेळपट्टीचीच चर्चा ऐरणीवर आहे.
‘आयपीएल’च्या पहिल्यावहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा संघ फक्त ७० धावांवर गडगडला होता. मग हे सोपे आव्हान पेलण्यासाठी चेन्नईसारख्या संघाला १८व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली होती. या सामन्यानंतर खेळपट्टीबाबत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली यांनी टीका केली. त्यामुळे रविवारी खेळपट्टी कोणते रंग दाखवेल, याबाबत क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे.
गतविजेत्या चेन्नईने दोन सलग विजयांसह आपली घोडदौड कायम राखली आहे. बंगळूरु व दिल्ली कॅपिटल्सला त्यांनी सहजरीत्या नामोहरम केले आहे. चेन्नईने तीन परदेशी खेळाडू खेळवण्याचे धोरण कायम राखले तर दक्षिण आफ्रिकेचा संघनायक फॅफ डय़ू प्लेसिसला संधी मिळणार नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी दोन्ही सामन्यांत अप्रतिम गोलंदाजी केली. मात्र संघाच्या फलंदाजीत आणि कर्णधार धोनीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. दिल्लीविरुद्ध धोनीने नाबाद ३२ धावांची खेळी साकारली होती. हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्हो या अनुभवी खेळाडूंनी दर्जाला साजेशी कामगिरी दाखवली आहे.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने गमावले असून, चेन्नईला त्यांच्या मैदानावर हरवण्याचे अवघड आव्हान त्यांच्यापुढे असेल. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या रंगतदार सामन्यात राजस्थानने हार पत्करली होती. रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने धावचीत केल्यामुळे हा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला. शुक्रवारी राजस्थानने सनरायजर्स हैदराबादकडून पराभव पत्करला. या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद १०२ धावांची शतकी खेळी साकारून लक्ष वेधले. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीबाबत समाधानी आहे, परंतु गोलंदाजांनी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अधिक आत्मविश्वासाने कामगिरी करण्याची अपेक्षा त्याने प्रकट केली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन. जगदीशन (यष्टीरक्षक).
राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.
