Cricketer Died During Match: क्रिकेटमध्ये हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पंजाबच्या फिरोजपूरमध्ये घडली आहे. फलंदाजाने फलंदाजी मारून अर्धशतक पूर्ण केलं. सेलिब्रेशन करणार होता इतक्यात मैदानावर कोसळला. त्याच्या सह खेळाडूने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बेशुद्ध झाला.

मैदानावर कोसळल्यानंतर इतर खेळाडूंनी मैदानाच्या दिशेने धाव घेत त्याला सीपीआर दिला. मात्र त्याची हालचाल होत नसल्याने त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मृत पावलेल्या खेळाडूचं नाव हरजीत सिंग असल्याची माहिती मिळाली आहे. हरजीत सिंगला एक मुलगा देखील आहे.

नेमकं काय घडलं?

तर झालं असं की, पंजाबमधील फिरोजपूर येथील डीएव्ही शाळेच्या मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू होता. माध्यमातील वृत्तानुसार हरजीत सिंग फलंदाजीला उतरला होता. ज्यावेळी हरजीत सिंग फलंदाजी करत होता, त्यावेळी सामना पाहता असलेले प्रेक्षक सामना मोबाईलवर रेकॉर्ड करत होते.

हरजीत सिंग ४९ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी त्याने षटकार मारला आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण होताच, तो सेलिब्रेशन करण्यासाठी पुढे जात होता. इतक्यात हरजीत मैदानावर कोसळला. खेळाडूंनी क्षणही न दवडता, हरजीतच्या दिशेने धाव घेतली. खेळाडूंनी त्याला सीपीआर दिला. त्याचे हात-पाय चोळले.

मात्र,रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याने प्राण सोडले होते. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. क्रिकेट खेळत असताना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही पुण्यात इम्रान पटेल नावाच्या खेळाडूला छातीत त्रास झाला होता. त्यानंतर मैदानाबाहेर जात असताना तो कोसळला होता. त्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच जालन्यातही अशीच एक घटना घडली होती. ३२ वर्षीय तरूणाने फलंदाजी करत असताना षटकार मारला आणि त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला होता.