इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मात्र अजुनही भारतीय संघात मधल्या फळीतल्या फलंदाजीच्या क्रमाचं गणित काहीकेल्या सुटताना दिसत नाहीये. प्रत्येक आजी-माजी खेळाडू आपापल्यापरीने मत मांडत आहेत. त्यात आज सचिन तेंडुलकरची भर पडली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं मत, सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे. तो EspnCricinfo या संकेतस्थळाशी बोलत होता.

“माझ्या मते धोनीने विश्वचषकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं. स्पर्धेत नेमका कोणता संघ उतरणार आहे, याची मला कल्पना नाही. मात्र शिखर आणि रोहित डावाची सुरुवात करणार असतील तर विराट हा साहजिकपणे तिसऱ्या स्थानावर खेळेल. यानंतर चौथ्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाला संधी दिल्यास पाचव्या क्रमांकासाठी धोनी हा योग्य पर्याय आहे. यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी येऊ शकतो.” सचिनने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या जर्सीमधला बदल पाहिलात का??

धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यास तो अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचू शकतो. सहाव्या क्रमांकापासून भारताचे सर्व फलंदाज फटकेबाजी करणार आहेत. त्यामुळे धोनीवरचा दबावही थोडा हलका होऊ शकतो, सचिन धोनीबद्दल बोलत होता. २०११ साली विश्वचषक विजेत्या भारतीय संघात सचिन धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

अवश्य वाचा – विश्वचषकात केदार जाधवची भूमिका महत्वाची असेल – चंद्रकांत पंडीत