CWG 2022 Ind Vs Pak T20 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (३१ जुलै) भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० सामना खेळवण्यात आला. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधाना धमाकेदार अर्धशतकीय खेळी करून भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. हा सामना संपूर्ण भारतीय संघासाठी खास ठरला. या शिवाय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठीदेखील हा सामना विशेष ठरला. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून तिने पुरुष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. मात्र, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतने आता धोनीला मागे सोडले आहे. आंतरराष्ट्रीय टी २० संघाचा कर्णधार म्हणून धोनीने ७२ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४१ सामन्यांमध्ये त्याला विजय मिळवता आला. याबाबत हरमनप्रीत धोनीपेक्षा एक पाऊल पुढे गेली आहे. तिने टी २० संघाचा कर्णधार म्हणून ७१ सामने खेळले आहेत आणि ४२मध्ये विजय मिळवला आहे. तिच्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी धोनीसोबत तिची तुलनाही केली आहे.

हेही वाचा – IND vs WI T20 Series: सामन्यापूर्वी भारतीय संघाचा झाला ‘खास’ पाहुणचार; गप्पा-टप्पा आणि बरंच काही

२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ स्थितीतील होता. भारतीय संघाने शानदार खेळ करून पाकिस्तानचा सहज पराभव केला. या विजयासह हरमनप्रीतने भारतीय कर्णधार म्हणून टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४२वा विजय मिळवला. अशी कामगिरी करून तिने महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये शार्लोत एडवर्ड्स (६८) आणि मॅग लॅनिंग (६४) च्या नंतर तिसरे स्थान पटकावले आहे.

पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “जिंकल्यानंतर छान वाटत आहे. पहिला विजय नेहमीच महत्त्वाचा असतो. आज बर्‍याच सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत आणि आम्ही त्यात सातत्य ठेवू इच्छितो. संघ म्हणून कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. आम्ही आज चांगली सुरुवात केली आणि लवकर विजय मिळवला.”