वृत्तसंस्था, कोलोन (जर्मनी)

अनुभवी आक्रमकपटू झेर्दान शकिरीच्या शानदार गोलमुळे स्वित्झर्लंडने पिछाडीवरून पुनरागमन करताना युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. स्वित्झर्लंडला विजय मिळवण्यात अपयश आले असले, तरी त्यांनी बाद फेरीसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.

कोलोन येथे झालेल्या अ-गटातील या सामन्यात दोन्ही संघांना उत्तरार्धात विजयाची संधी होती. मात्र, स्वित्झर्लंडच्या झेकी अमादुनीला, तर स्कॉटलंडच्या ग्रांट हेनलीला गोलचा वेध घेण्यात अपयश आले. त्यामुळे दोन्ही संघांना एकेक गुणावर समाधान मानावे लागले. या निकालानंतर स्वित्झर्लंडचे दोन सामन्यांत चार, तर स्कॉटलंडचा एक गुण झाला आहे. आता बाद फेरी गाठायची झाल्यास अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडला हंगेरीविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल आणि स्वित्झर्लंडचा संघ जर्मनीकडून पराभूत होईल, अशी आशाही करावी लागेल. जर्मनीने दोनही सामने जिंकताना या गटातून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

हेही वाचा >>>T20 WC 2024: टीम इंडियाने पार केली ‘अफगाण खिंड’; सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी ठरली निर्णायक

स्कॉटलंड विरुद्ध स्वित्झर्लंड या सामन्यात दोनही संघांचा चेंडू आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न होता. १३व्या मिनिटाला स्कॉट मॅकटॉमिनेने मारलेला फटका स्वित्झर्लंडचा बचावपटू फॅबियन शेरच्या पायाला लागून गोलजाळ्यात गेला आणि स्कॉटलंडला १-० अशी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी केवळ १३ मिनिटेच टिकू शकली. सामन्याच्या २६व्या मिनिटाला स्कॉटलंडच्या अॅन्थनी रालस्टनकडून मागील दिशेला पास देण्याच्या नादात चूक झाली आणि शकिरीने गोलकक्षाच्या बाहेरूनच अप्रतिम फटका मारत चेंडूला जाळ्यात पोहोचवले. अमेरिकेतील शिकागो फायर क्लबसाठी खेळणाऱ्या शकिरीने गोलच्या वरील कोपऱ्यात मारलेला फटका स्कॉटलंडचा गोलरक्षक अँगस गनला अडवता आला नाही. त्यामुळे स्वित्झर्लंडने सामन्यात बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघांकडून गोलचे प्रयत्न झाले, पण त्यांना यश न मिळाल्याने अखेर सामना १-१ असा बरोबरीतच संपला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शकिरीचा गोलधडाका

डावखुऱ्या शकिरीने २०१४ नंतर झालेल्या तीन युरो आणि तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये किमान एक गोल करण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.