Pakistan Cricket Team: जम्मू आणि काश्मीरच्या पलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पश्चिम बंगालचा माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी याने पाकिस्तानशी सर्व प्रकारचे क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी केली आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केलेल्या गोस्वामीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचेही समर्थन केले आहे.

श्रीवत्स गोस्वामी याने नुकतेच एक्सवर एक नोट शेअर केली आहे. ज्याचे कॅप्शन ‘ आता पुरे झाले’, असे आहे. या नोटमध्ये श्रीवत्स गोस्वामीने लिहिले की, “म्हणूनच मी म्हणतो की पाकिस्तानबरोबर कधीही क्रिकेट खेळू नये. जेव्हा बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला तेव्हा काही लोक त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. खेळाळा राजकारणापासून वेगळे ठेवले पाहिजे.”

श्रीवत्स गोस्वामीने पुढे लिहिले की, “मला वाटते की निष्पाप भारतीयांना मारणे हा त्यांचा राष्ट्रीय खेळ बनला आहे. आणि जर ते (पाकिस्तान) असे खेळत असतील तर त्यांना समजणाऱ्या भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे.”

श्रीवत्स गोस्वामी काही महिन्यांपूर्वी काश्मीरला गेला होता. त्याचा संदर्भ देत त्याने लिहिले, “मला खूप अस्वस्थता आणि वेदना होत आहेत. काही महिन्यांपूर्वी मी काश्मीरमध्ये खेळल्या गेलेल्या लेजेंड्स लीगचा भाग होतो. या काळात मी पहलगामला गेलो. स्थानिक लोकांना भेटलो. त्याच्या डोळ्यात मला आशा दिसली. असे वाटत होते की काश्मीर अखेर शांतता आणि स्थैर्याच्या मार्गावर आहे आणि आता पुन्हा रक्तपात. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, आपण किती काळ गप्प राहणार? आणि आपले लोक मरत असताना आपण किती काळ हे खेळत राहणार? आता नाही. यावेळी अजिबात नाही.”

कोण आहे श्रीवत्स गोस्वामी?

श्रीवत्स गोस्वामी हा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने बहुतेक प्रथम श्रेणी क्रिकेट पश्चिम बंगाल संघाकडून खेळले आहे. पण कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात तो मिझोरम संघात सहभागी झाला होता. गोस्वामी, विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील २००८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीवत्स गोस्वामीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.