Suryakumar Yadav At Express Adda: भारतीय टी -२० संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघ ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. वनडे मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. टी -२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय टी -२० संघाचा कर्णधार सूर्यकमार यादवने ‘एक्सप्रेस अड्डा’ला हजेरी लावली.
द इंडियन एक्सप्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि इंडियन एक्सप्रेसचे उप-सहयोगी संपादक देवेंद्र पांडे यांच्याशी भारतीय टी -२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संवाद साधला.
काही दिवसांपूर्वीच शुबमन गिलची वनडे संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली आहे. गिल वनडे संघाचा कर्णधार बनल्यानंतर टी -२० संघातील स्थान गमावण्याची भीती वाटते का? असा प्रश्न विचारला असता सूर्यकुमार यादव म्हणाला, “ मी खोटं बोलणार नाही. प्रत्येकाला या गोष्टीची भीती वाटतेच. पण ही अशी भीती आहे जी आणखी काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रेरित करते.”
याबाबत बोलताना तो पुढे म्हणाला, “शुबमन आणि माझे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील संबंध खूप चांगले आहेत. त्यामुळे तो एक माणूस म्हणून आणि एक खेळाडू म्हणून कसा आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे तो मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो.”तसेच तो पुढे म्हणाला की, “जर मी इतका घाबरलो असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी माझा पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळलो ते खेळू शकलो नसतो. त्यामुळे जी भीती होती, ती भीती मी खूप मागे सोडली आहे.“ असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
शुबमन गिलची वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली आहे. गिलबाबत बोलताना सूर्या म्हणाला, “त्याची २ फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मला त्याच्यासाठी खूप आनंद होत आहे. त्याने खरोखरच खूप चांगली कामगिरी केली आहे.” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.