MLC 2025, Faf Du Plessis Catch Video: मेजर लीग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू फाफ डू प्लेसिसने डाईव्ह मारत एका हाताने झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फाफ डू प्लेसिसने स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल टिपला आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात टेक्सास सुपर किंग्ज आणि एमआय न्यूयॉर्क या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात फाफ डू प्लेसिसने टेक्सास सुपर किंग्ज संघाकडून खेळताना हा भन्नाट झेल टिपला.

तर झाले असे की, टेक्सास सुपर किंग्ज संघाची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी ॲडम मिल्ने गोलंदाजी करत होता. ॲडम मिल्नेने स्लो चेंडू टाकला. या चेंडूवर डावखुऱ्या हाताच्या ब्रेसवेलने कव्हरच्या दिशेने वेगाने शॉट मारला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता. इतक्यात फाफ डू प्लेसिसने चित्यासारखी झेप घेतली आणि एका हाताने भन्नाट झेल घेतला. हा एमआय न्यूयॉर्क संघासाठी चौथा धक्का होता. ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी एमआय न्यूयॉर्क संघाने १२१ धावांपर्यंत मजल मारली होती. एमआय न्यूयॉर्क संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८६ धावांचा पाठलाग करायचा होता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, टेक्सास सुपर किंग्ज संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्ज संघाला २० षटकांअखेर ६ गडी बाद १८५ धावा करता आल्या. टेक्सास सुपर किंग्ज संघाकडून फलंदाजी करताना डेवोन कॉन्व्हेने ४४ चेंडूत ताबडतोड ६५ धावांची खेळी केली. त्याला साथ देत, कॅल्विन सेवेजने ३४ चेंडूत ताबडतोड ५३ धावांची खेळी केली. यासह टेक्सास सुपर किंग्ज संघाने एमआय न्यूयॉर्क संघासमोर विजयासाठी १८६ धावांचे आव्हान ठेवले.

या धावांचा पाठलाग करताना एमआय न्यूयॉर्क संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेले अग्नी चोपडा आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात माघारी परतले. ४ षटकात अवघ्या १५ धावांवर एमआय न्यूयॉर्क संघाचे २ प्रमुख फलंदाज माघारी परतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मोनाक पटेलने ४४ चेंडूत ६२ आणि बेसवेलने २१ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. शेवटी कायरन पोलार्डनेही तुफान फटकेबाजी केली. मात्र, फाफ डू प्लेसिसने पकडलेला झेल या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. एमआय न्यूयॉर्क संघात १८२ धावांपर्यंत मजल मारता आली.