Sachithra Senanayake Match Fixing News: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोपावरून दोषी ठरवण्यात आले आहे. लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील २०२० मध्ये झालेल्या हंगामात त्याने आपल्या सहकारी खेळाडूला आमीष दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हंबनटोटा उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तो या स्पर्धेत खेळत नव्हता. ज्यावेळी ही स्पर्धा सुरू होती त्यावेळी तो परदेशात होता. परदेशातून त्याने मॅच फिक्सिंगसाठी खेळाडूशी संपर्क साधला.

श्रीलंकेतील डेली मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ” सचित्रा सेनानायकेने लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्याच हंगामात सहभागी झालेल्या २ खेळाडूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. यासह त्याने दोघांनाही मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याचं आमिष दिलं.”

श्रीलंकेत नवा भ्रष्टाचार विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू केल्यानंतर घडलेली ही पहिलीच घटना असल्याचं श्रीलंकेच्या ॲटर्नी विभागाने दिलेल्या माहितीत म्हटलं गेलं आहे. सचित्रा सेनानायकेला याआधी २०२३ मध्येही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र, त्याच्यावर प्रवास बंदी अजूनही कायम आहे.

सचित्रा सेनानायकेने २०१२ ते २०१६ या कालावधीत श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याला ४९ एकदिवसीय आणि २४ टी –२० सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या टी –२० कारकिर्दीत ७८ गडी बाद केले आहेत. यासह तो २०१४ मध्ये श्रीलंकेच्या टी –२० वर्ल्डकविजेत्या संघाचा भाग होता.

असा राहिलाय रेकॉर्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचित्रा सेनानायकेच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला २०१२ मध्ये श्रीलंकेकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला १ कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४९ सामन्यांमध्ये ५३ गडी बाद केले आहेत. तर २४ टी–२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २५ गडी बाद केले आहेत. आयपीएल स्पर्धेतील ८ सामन्यांमध्ये त्याला ९ गडी बाद करता आले आहेत.