मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान आजपासून सुरू होणारा बॉर्डर-गावस्कर करंडकाचा चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा राहणार आहे. या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध दशकातील पहिल्या मालिका विजेतेपदाच्या शर्यतीत पुढे राहील. त्याच वेळी भारताने हा सामना गमाविल्यास त्यांची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी या वेळी मुकणार आहे. त्यामुळे साहजिकच दोन्ही संघ या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ दाखविण्यासाठी उत्सुक असतील.

मेलबर्नवर अलीकडच्या काळात झालेला प्रत्येक सामना निर्णायक ठरला आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे वातावरणही क्रिकेटला पोषक आहे. खेळपट्टी हिरवीगार असली, तरी नव्या चेंडूंवर सुरुवातीची काही षटके खेळून काढल्यावर फलंदाजी करणे सोपे राहणार आहे. सामन्याची बहुतेक सर्व तिकिटे संपली असून, किमान पहिल्या दिवशी ९० हजार प्रेक्षकांसमोर खेळाला सुरुवात होईल असा अंदाज आहे.

हेही वाचा >>> ‘एसए२०’चे वाढते महत्त्व कार्तिकच्या सहभागाने अधोरेखित! लीगचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांचे वक्तव्य

● वेळ : पहाटे ५ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी.

सर्वोत्तम सांघिक प्रयत्न आवश्यक

ऑस्ट्रेलियासाठीही सलामी हा चिंतेचा विषय ठरत आहे. सुरुवातीच्या कसोटी सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजा व नेथन मॅकस्वीनी यांनी सुरुवात केली. मॅकस्वीनीच्या जागी ऑस्ट्रेलियाने ११ प्रथम श्रेणी सामने खेळल्यानंतर लगेचच १९ वर्षीय स्टॅन कोन्सटासला संधी दिली आहे. भारताच्या जसप्रीत बुमरासमोर कोन्सटास कशी कामगिरी करतो याकडे ऑस्ट्रेलियाचा नजरा असतील. मार्नस लबूशेनकडूनही धावांची अपेक्षा आहे. ट्रॅव्हिस हेड त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीमध्ये असून, त्याची खेळी पुन्हा एकदा निर्णायक ठरु शकते. स्टीव्ह स्मिथकडून ब्रिस्बेनमधील शतकी खेळीनंतर परत एकदा अशाच खेळीची अपेक्षा बाळगली गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. मिचेल स्टार्कने प्रत्येक कसोटीत भारतीय फलंदाजांच्या संयमाची कसोटी पाहिली आहे. पॅट कमिन्सनेही भारतीय फलंदाजांच्या उसळणारे चेंडू खेळण्याच्या उणिवेवर बोट ठेवले आहे. हेझलवूड नसला, तरी बोलँड आपली सिद्धता दाखविण्यासाठी सज्ज आहे.

रोहितच्या लयीची चिंता

भारताला कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजी क्रमांकाची चिंता आहे. चौथ्या कसोटीच्या पार्श्वभूमीवर अद्याप रोहित कुठल्या स्थानावर खेळणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, तरी संघ व्यवस्थापन सलामीची जोडी बदलण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत, रोहित शर्मा, विराट कोहली अशी तगडी फलंदाजी असूनही या दौऱ्यात ती खात्रीशीर राहिलेली नाही. फलंदाज म्हणून रोहितची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, पण यासाठी त्याला सलामीला खेळावे लागेल. संघ व्यवस्थापन सध्या तरी याला तयार नाही. भारतीय प्रमुख फलंदाजांची लय आणि त्यांना सरावासाठी उपलब्ध करून दिलेल्या वापरलेल्या खेळपट्ट्या हा चर्चेचा विषय राहिला आहे. अर्थात, याकडे काहीसा कानाडोळा करत भारतीय संघाने मनापासून सराव केला आहे. या मालिकेत भारताच्या गोलंदाजीची धुरा बुमरा सांभाळत आहे. या सामन्यात बुमराला अन्य गोलंदाज कशी साथ करतात हे भारतासाठी महत्त्वाचे असेल. गेल्या दोन कसोटी सामन्यांत ट्रॅव्हिस हेड हा भारतासाठी अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे त्याला बाद करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.