पॅरिस : द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाची फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आली. क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचने तिला ६-३, ६-३ असे पराभूत केले. चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाने ३१व्या मानांकित पेट्राविरुद्ध सातत्याने चुका केल्या. त्यामुळे पेट्राने मातीच्या कोर्टवर सलग १४ सामने जिंकण्याचा करिष्मा करून दाखवला आहे. प्लिस्कोव्हाने या सामन्यात तब्बल २८ टाळण्याजोग्या चुका केल्या. त्यामुळे पेट्राला कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे. पेट्राला पुढील सामन्यात रशियाच्या व्हेरोनिका कुदरमेतोव्हा किंवा एस्टोनियाच्या काइया कानेपी यांच्यातील विजेत्याशी झुंजावे लागणार आहे.
शरण-मार्सेलोची जोडी पराभूत
या ग्रँडस्लॅममधील भारतीय आशा असलेल्या दिविज शरण आणि त्याचा ब्राझिलचा सहकारी मार्सेलो डेमोलिनेर यांचे स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. आठव्या मानांकित हेन्री कोंटिनेन आणि जॉन पीअर्स या जोडीने शरण-मार्सेलो जोडीला ६-३, ६-४ असे पराभूत केले. दोन्ही सेटमध्ये हेन्री आणि जॉन यांनी दोघांच्या सव्र्हिस भेदत सामना जिंकून घेतला.