वृत्तसंस्था, पॅरिस : पोलंडची २१ वर्षीय खेळाडू इगा श्वीऑनटेकने विश्वातील अव्वल महिला टेनिसपटूच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना कारकीर्दीत दुसऱ्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या कोको गॉफवर सरळ सेटमध्ये मात करताना महिला टेनिसवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.  

अग्रमानांकित श्वीऑनटेकला सुरुवातीपासूनच फ्रेंच खुली स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. तिने अगदी पहिल्या फेरीपासून वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना पाच पैकी चार सामने सरळ सेटमध्ये जिंकत अंतिम फेरीचा टप्पा गाठला. अंतिम सामन्यात गॉफ तिला झुंज देईल असे अपेक्षित होते. मात्र, १८ वर्षीय गॉफला दडपणात सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले.

श्वीऑनटेकने सफाईदार खेळ करताना गॉफचे आव्हान ६-१, ६-३ असे सहज परतवून लावत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात गॉफने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या सेटमध्ये श्वीऑनटेकने तिची सव्‍‌र्हिस तब्बल तीन वेळा मोडली. दुसऱ्या सेटमध्ये गॉफने खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. तिने या सेटमध्ये २-० अशी आघाडीही मिळवली. मात्र, श्वीऑनटेकने पुन्हा खेळ उंचावत सरळ पाच गेम जिंकले आणि ५-२ अशी आघाडी घेतली. गॉफला यानंतर पुनरागमन करण्यात अपयश आले. श्वीऑनटेकने या सेटसह सामना आणि स्पर्धाही जिंकली.  

श्वीऑनटेकचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेतील आणि ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील दुसरे जेतेपद ठरले. तिने २०२०मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. फ्रेंच स्पर्धेत आतापर्यंत श्वीऑनटेकने २१ सामने जिंकले असून केवळ दोन सामने गमावले आहेत.श्वीऑनटेकने गेले सलग ३५ सामने जिंकले असून व्हिनस विल्यम्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. या दरम्यान तिने सहा स्पर्धाही जिंकल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकले होते. तो विजय माझ्यासाठी खूप खास होता. त्यानंतर मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे. माझ्यावर यंदा अपेक्षांचे दडपण होते. मात्र, त्यांचा माझ्या खेळावर परिणाम झाला नाही. तसेच मला युक्रेनलाही संदेश द्यायचा आहे. युद्ध अजूनही सुरू आहे आणि तुम्ही कणखर राहा. संपूर्ण जग तुमच्या पाठीशी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 – इगा श्वीऑनटेक