सध्या इंग्लंडमधील क्रिकेट जगतात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी क्रिकेटपटू जो रुट याने इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या कर्णधाराच्या शोधात होता. हा शोध आता पूर्ण झाला असून बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. तशी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार स्टोक्सने कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यास संमती दिली आहे. तसेच इंग्लंड क्रिकेटमध्ये आणखी एक बदल होणार असून प्रसिद्ध आणि मोठा अनुभव असलेले गॅरी कस्टर्न इंग्लंड संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> IPLच्या लिलावादरम्यान माझ्यासोबत फसवणूक आणि विश्वासघात झाला; हर्षल पटेलने सांगितली दुःखद आठवण

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या गुजरात टायटन्स संघाला प्रशिक्षण देणारे गॅरी कस्टर्न यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांनी २०११ साली भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. २००८ साली त्यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंना त्यांनी मोलाचे प्रशिक्षण दिले होते. त्याचाच परिपाक म्हणून भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. सध्या ते गुजरात टायटन्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. मात्र आयपीएल संपताच ते इंग्लंड संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारु शकतात.

हेही वाचा >> “कोहलीने आता ब्रेक घ्यावा, तेच शहाणपणाचं ठरेल,” रवी शास्त्रींचा विराटला सल्ला

गॅरी कस्टर्न यांनी इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मला क्रिकेटच्या कोणत्याही एका फॉरमॅटसाठी जरी प्रशिक्षक म्हणून निवडलं तर ती संधी मी स्वीकारेल असं गॅरी कस्टर्न यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लवकरच ते इंग्लंड संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करु शकतात. गॅरी कस्टर्न यांनी भारत तसेच दक्षिण आफ्रिका संघालाही यापूर्वी प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा इंग्लंडला फायदा होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garry custorn to become england mens cricket team coach prd
First published on: 27-04-2022 at 19:14 IST