टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या पदासाठी रीतसर अर्ज मागवण्यात आले आहेत. अशात गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षण होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, या चर्चांवर आता गौतम गंभीरने भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाला गौतम गंभीर?
रविवारी एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीरने यासंदर्भात भाष्य केलं आहे. मला आजवर अनेकांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात प्रश्न विचारले. पण मी त्यांना उत्तर दिलं नाही. मात्र, आज मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. मला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला नक्कीच आवडेल. भारतीय संघाला प्रशिक्षण देणं, हा माझ्यासाठी सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
पुढे बोलताना, भारतीय संघाच्या प्रशिक्षक बनणे म्हणजे तुम्ही १४० कोटी भारतीयांचं प्रतिनिधीत्व करत असता, या १४० कोटी भारतीयांनी मला विश्वचषक जिंकण्यास मदत केली होती. जर सर्वांनी भारतीय संघासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तर भारतीय संघ नक्कीच विश्वचषक जिंकेल, असेही तो म्हणाला.
प्रशिक्षकपदासाठी कोण शर्यतीत?
दरम्यान, द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने सध्या प्रशिक्षक पदासाठी अनेक नावे समोर येत आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव आघाडीवर आहे. द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांनी यापूर्वी भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. २०२२ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धची मालिका लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ३-० अशी जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या संघासोबतही लक्ष्मण होते. आयर्लंड दौऱ्यातही त्यांच्या मार्गदर्शनात संघाने चमकदार कामगिरी केली.
याशिवाय आशीष नेहराचे नावही सध्या चर्चेत आहे. ‘आयपीएल’मधील गुजरात टायटन्स संघाचा प्रशिक्षक असलेल्या नेहराने या संघाला २०२२ मध्ये जेतेपद व २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळवून दिले. गुजरातने पहिल्या दोन हंगामात त्याच्या मार्गदर्शनाखाली २३ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार
यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचाही विचार केला जाऊ शकतो. पॉन्टिंगला प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान त्याने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. २०१५मध्ये संघाने जेतेपद मिळवले. यासह दिल्ली कॅपिटल्स संघासोबत तो २०१८पासून आहे. द्रविड प्रशिक्षक होण्यापूर्वी पॉन्टिंगलाही प्रशिक्षकपदाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने त्यावेळी नकार दिला असल्याचे समजते आहे.