Hardik Pandya Record: आशिया चषकातील भारत- पाकिस्तान सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पाकिस्तानच्या फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. सुरूवातीच्या षटकांमध्ये पाकिस्तानला २ मोठे धक्के बसले. दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मोठ्या विक्रमात विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

हार्दिकने मोडला विराट कोहलीचा विक्रम

या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरूवात करून दिली. हार्दिक पांड्याने समन्यातील पहिल्याच चेंडूवर सईम अयुबला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मोहम्मद हारिसला बाद करत पाकिस्तानला ६ धावसंख्येवर दुसरा मोठा धक्का दिला.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून दुसरे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बुमराहने मोहम्मद हारिसला बाद केलं. त्याला बाद करण्यासाठी हार्दिक पांड्याने सोपा झेले घेतला. यासह त्याने भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. हार्दिकच्या नावे आता ५५ झेल टिपण्याची नोंद आहे .

विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४ झेल टिपले होते. तर हार्दिकने आता ५५ झेल घेतले आहेत. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माच्या नावे ६५ झेल टिपण्याची नोंद आहे. तर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावे ५१ झेल टिपण्याची नोंद आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू

रोहित शर्मा- ६५ झेल

हार्दिक पांड्या -५५ झेल

विराट कोहली- ५४ झेल

सूर्यकुमार यादव -५१ झेल

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती