Harshit Rana Fight Video IND vs AUS 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरला होता. यामध्ये मालिकेतील पहिल्याच सामन्यात हर्षित राणाला संधी देण्यात आली. हर्षित राणासह मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग हे गोलंदाजही होते. पण दोन्ही गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. तर हर्षित राणा मात्र प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. यामुळे तो मैदानावर वैतागलेला दिसला आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाशी वाद घालतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

पावसामुळे चार वेळा व्यत्यय आलेला हा सामना अखेरीस २६ षटकांचा खेळवण्यात आला. भारतीय संघाची टॉप फलंदाजी फळी या सामन्यात फेल ठरली. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल २५ धावांवर बाद होत माघारी परतले. यानंतर केएल राहुल, अक्षर पटेल आणि नितीश रेड्डी यांच्या योगदानामुळे भारतीय संघाने १३६ धावा केल्या. पण डीएलएसमुळे कांगारूंना १३१ धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी २१ षटकांत सहज पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाच्या डावात मात्र हर्षित राणा ऑस्ट्रेलियन फलंदाजाशी वाद घालताना दिसला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आपला संयम गमावत, ऑस्ट्रेलियन फलंदाज जोश फिलीपीने षटकार लगावतच तो वाद घालू पाहत होता.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील अकराव्या षटकात हा प्रसंग घडला. राणाने ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू टाकला, जो फिलीपीच्या चेंडूची कड घेत थर्ड मॅनच्या वरून षटकारासाठी गेला. बॅटने जाणूनबुजून फटका न खेळता सहज धावा गेल्याचे पाहताच राणाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

राणाने पुढचाच चेंडू टाकला जो फिलीपीने डिफेंड केला. चेंडू बाजूला सरकताच, राणाने संतापून फलंदाजाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी करू शकत नसल्याचा दबाव त्याच्यावर दिसून येत होता. हर्षित राणाने ४ षटकांत ६.८० च्या इकॉनॉमी रेटने २७ धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही.

हर्षित राणाशिवाय मोहम्मद सिराजने ४ षटकांत २१ धावा दिल्या, त्याने यादरम्यान एक मेडन षटकही टाकलं. याशिवाय अर्शदीप सिंगने ५ षटकांत ३१ धावा देत एक विकेट घेतली. तर अक्षरनेही एक विकेट घेतली.