India Women’s Qualification Scenario for World Cup 2025: भारतीय महिला संघाला इंग्लंडविरूद्ध सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागेल. इंग्लंड संघाने भारताचा अवघ्या ४ धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली. या पराभवासह भारताने चांगल्या सुरूवातीनंतर वर्ल्डकपमध्ये सलग ३ सामने गमावले आहेत. यामुळे संघाचं सेमीफायनलमधील स्थान आता धोक्यात आलं आहे. भारताला जर सेमीफायनल गाठायची असेल तर काय करावं लागणार, जाणून घेऊया.
२८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने सामन्यावर चांगली पकड ठेवली होती. ३१व्या षटकापर्यंत २ बाद १६७ धावा संघाची स्थिती होती आणि संघ हळूहळू विजयाच्या दिशेने जात होता. मात्र, हरमनप्रीत कौर (७०) बाद झाल्यानंतर सामना इंग्लंडच्या बाजूने वळताना दिसत होता. पण यानंतरही स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला ४२व्या षटकापर्यंत ३ बाद २३४ धावांपर्यंत नेलं. पण नंतर मानधनाने एक वाईट फटका खेळत ८८ धावांवर बाद झाली आणि इथून सामना भारताच्या हातून निसटला.
दीप्ती शर्माने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावलं, मात्र दुसऱ्या टोकाला विकेट्स सतत पडत राहिल्या. शेवटी इंग्लंडने अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकत विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारत हा सामना फक्त एकेरी धावा घेऊनही जिंकू शकला असता, पण चुकीच्या रणनीतीमुळे आणि मोठे फटके खेळण्याच्या आवेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे संघाला मोठा पराभव पत्करावा लागला.
भारतीय महिला संघासाठी इंग्लंडविरूद्ध पराभवानंतर कसं आहे क्वालिफिकेशनचं समीकरण?
भारतीय संघाचं सलग तीन पराभवांसह सेमीफायनलमधील स्थान धोक्यात आहे. कारण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आधीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे आणि आता फक्त एकच जागा शिल्लक आहे.
भारताने चांगल्या सुरूवात केल्यामुळे संघ उपांत्य फेरीत पोहोचेल याच्या आशा होत्या. संघाने पहिल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानं भारताची स्थिती अधिक बिकट झाली आहे.
सध्या भारतीय संघ ४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे आणि संघाचे अजून न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सामने बाकी आहेत. जर भारत हे दोन्ही सामने जिंकला, तर त्याचे गुण ८ पर्यंत जातील आणि त्यानंतर कोणताही दुसरा संघ या गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणजेच भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
भारताला कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. जर भारताने न्यूझीलंडविरूद्ध सामना गमावला आणि फक्त बांगलादेशविरुद्ध सामना जिंकला, तर त्यांचे गुण ६ राहतील आणि अशा स्थितीत न्यूझीलंडला पुढे जाण्याची संधी मिळू शकते.