आशिया चषक स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सनी विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं. प्राथमिक फेरी, सुपर फोर आणि अंतिम लढत अशा तिन्ही लढतीत भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्भेळ यश मिळवलं. पाकिस्तानच्या सलामीवारांनी दणक्यात सुरुवात केली मात्र बिनीचे शिलेदार माघारी परतताच पाकिस्तानची घसरगुंडी उडाली. भारताची सुरुवातही डळमळीत झाली. पण तिलक वर्माने संयमी खेळी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. शिवम दुबे आणि संजू सॅमसनने त्याला चांगली साथ दिली.

हार्दिकची उणीव शिवम दुबेने काढली भरून

अष्टपैलू हार्दिक पंड्या फायनल खेळू शकणार नाही हा भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. हार्दिक बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर योगदान देतो. हार्दिकमुळे संघाला अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाज आवश्यकतेनुसार खेळवता येतो. श्रीलंकेविरुद्ध हार्दिकने एक षटक टाकलं. मात्र त्यानंतर तो ड्रेसिंगरुमध्ये परतला. त्यानंतरच तो फायनल खेळणार का याविषयी साशंकता निर्माण झाली. भारतीय संघाने हार्दिकऐवजी रिंकू सिंगला संघात समाविष्ट केलं. रिंकू गोलंदाजी करत नाही. हार्दिक नसल्यामुळे शिवम दुबेवर बुमराहच्या बरोबरीने नवीन चेंडू हाताळण्याची मोठी जबाबदारी आली. दुबे गोलंदाजी करतो पण विशेषज्ञ गोलंदाज म्हणून गोलंदाजी करणं हे शिवमसाठी मोठं आव्हान होतं. शिवमने डावाचं पहिलंच षटक टाकलं. साहिबजादा फरहान आणि फखर झमन यांनी जोरदार आक्रमण केलं पण शिवमने हार मानली नाही. ३ षटकात त्याने २३ धावा दिल्या. तो विकेट पटकावू शकला नाही पण त्याच्या गोलंदाजीवर प्रचंड धावा निघाल्या असं झालं नाही. फलंदाजी करताना दडपणाच्या स्थितीत शिवमने २२ चेंडूत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

फिरकीचं भेदक त्रिकुट-कुलदीप अक्षर आणि वरुण

कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या त्रिकुटाला केंद्रस्थानी ठेऊन भारतीय संघाने आशिया चषकासाठी रणनीती आखली. युएईतल्या संथ खेळपट्यांवर फिरकीचं जाळं रचून प्रतिस्पर्ध्यांना त्यात अडकवणं हीच भारतीय संघाची व्यूहरचना होती. या तिघांनी संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. ११३/१ या स्थितीतून पाकिस्तानचा डाव १४६ धावांतच गडगडला. यात या त्रिकुटाचा सिंहाचा वाटा आहे. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी चोख कामगिरी बजावली. तुफान फटकेबाजी करणाऱ्या साहिबजादा फरहानला वरुण चक्रवर्तीने तंबूत धाडलं. मुख्य अडथळा दूर होताच कुलदीपने सूत्रं हाती घेतली आणि पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. विकेट टू विकेट गोलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलने या दोघांना तोलामोलाची साथ देत पाकिस्तानच्या डावाला वेसण घातली. या तिघांनी मिळून ८ विकेट्स पटकावत फिरकीची भूमिका अधोरेखित केली.

तिलक वर्माची संस्मरणीय खेळी

आघाडीचे तीन शिलेदार तंबूत परतलेले असताना तिलक वर्मावर डाव सावरण्याची आणि त्याचवेळी धावगतीचं आव्हान आवाक्याबाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याची दुहेरी जबाबदारी होती. कसलेल्या फलंदाजाप्रमाणे तिलकने दोन्ही आघाड्या सुरेखपणे सांभाळल्या. तिलकने चांगल्या चेंडूचा सन्मान केला आणि त्याचवेळी खराब चेंडूवर चौकार-षटकार वसूल केले. कुठल्या गोलंदाजांवर आक्रमण करायचं याची पक्की जाणीव त्याला होती. तिलकने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलचं दडपण असतानाही तिलकने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६९ धावांची दिमाखदार खेळी केली. शिवम दुबे बाद झाल्यानंतर विजयाच्या आशा तिलकवर केंद्रित झाल्या. खणखणीत फटक्यांसह तिलकने भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला.

संजूची छोटी पण उपयुक्त खेळी

आशिया चषक स्पर्धेआधी भारतीय संघाने अभिषेक शर्माच्या बरोबरीने शुबमन गिलला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळावे लागले. संजूने सलामीला येत शतकी खेळी साकारल्या होत्या. मात्र त्याला पाचव्या क्रमांकावर खेळावं लागलं. संजूने फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत २४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव झटपट बाद झाल्याने संजूवर दडपण होतं. संजूने आक्रमक सुरुवात करत तिलकवरचं दडपण कमी केलं. संजूने २१ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २४ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला पण त्याने तिलकबरोबर भागीदारी रचत दडपण कमी केलं.

कॅचेस विन मॅचेस

भारतीय संघाने फायनलच्या लढतीत क्षेत्ररक्षण अचूक करण्यावर भर दिला. कॅचेस विन मॅचेस ही उक्ती त्यांनी सार्थ ठरवली. ८ कॅचेस टिपत भारतीय संघाने सरावात केलेली सगळी मेहनत सार्थ ठरवली. पाकिस्तानने ११३/१ अशी धडाकेबाज सुरुवात केली होती. तिथून पाकिस्तानचा डाव १४६ धावात आटोपला. गोलंदाजांना पुरेपूर साथ देत सगळ्या फिल्डर्सनी सामना भारताच्या बाजूने फिरवला.