Shubman Gill On Rohit Sharma: भारतीय संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी -२० संघात फार बदल करण्यात आलेले नाहीत. पण वनडे संघात मोठा बदल करण्यात आला आहे. अनुभवी खेळाडू रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान वेस्टइंडिजविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आम्हाला रोहित – विराटची गरज आहे

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी – २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे दोघेही केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहेत. विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे. तर रोहित शर्मा मुंबईत आहेत. दोघेही १५ ऑक्टोबरला भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. विराट आणि रोहितबाबत बोलताना गिल म्हणाला, “रोहित – विराटने मिळून भारतीय संघाला मिळून अनेक सामने जिंकून दिले आहेत. काही मोजक्याच लोकांकडे ही शैली आणि हा अनुभव असतो. आम्हाला त्यांची गरज आहे.”

कर्णधारपदाबाबत बोलताना गिल काय म्हणाला?

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली होती. याबाबत बोलताना गिल म्हणाला, “वेस्टइंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधारपदाबाबत घोषणा करण्यात आली. मला आधीच याबाबत माहिती देण्यात आली होती. भारतीय संघाचं नेतृत्व करणं ही अभिमानाची बाब आहे.”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल