सुहास खामकर हे मुंबईतील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे तर शरीरसौष्ठवातील देशभरातील एक अग्रगण्य नाव आणि नवव्यांदा ‘मि. इंडिया’ या किताबाला यंदा गवसणी घालत त्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. नवव्यांदा ‘मि.इंडिया’ किताब मिळवत त्याने शरीरसौष्ठव वर्तुळात सर्व विक्रम मोडत एक इतिहास रचला असून स्वत:चा विक्रम पुढच्या वर्षी मोडण्याचा त्याचा मानस आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ‘मि. युनिव्हर्स’ आणि ‘मि. ऑलिम्पिया’ या स्पर्धा होणार असून यास्पर्धेत विजेतेपदाचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. यासह बऱ्याच गोष्टी सुहासने उलगडल्या आहेत.
नवव्यांदा ‘मि. इंडिया’ हा मानाचा किताब पटकावल्यावर नेमक्या काय भावना आहेत ?
या स्पर्धेसाठी मी खास रणनीती आखली होती. त्यानुसार मी व्यायाम करत गेलो आणि मला यश मिळालं. यशाने नक्कीच आनंद झालाय, पण आता जबाबदारीही वाढली आहे. नवव्यांदा ही स्पर्धा जिंकत सारे विक्रम मी मागे सारत नवीन इतिहास लिहिला आहे. आता पुढच्या वर्षी माझा विक्रम मीच मोडण्यासाठी सज्ज असेन.
या स्पर्धेपूर्वी तू ‘महाराष्ट्र-श्री’ हा किताब पटकावलास आणि त्यापाठोपाठ ‘मि.इंडिया’ या दोन्ही स्पर्धासाठी कशी तयारी केली होतीस ?
‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेत मी ८५ किलो वजनी गटामध्ये उतरलो होतो, त्यासाठी दिवसाला ५ तास व्यायाम करायचो. त्याचबरोबर आहारावरही जास्त लक्ष दिलं होतं. ‘मि.इंडिया’ स्पर्धा आपण एकहाती जिंकायची हे तेव्हाच ठरवलं होतं. ‘मि. इंडिया’ या स्पर्धेसाठी मी ८० किलो वजनी गटात खेळायचं ठरवलं. त्यासाठी तीन किलो वजन कमी केलं. ही स्पर्धा चेन्नईमध्ये असल्याने उष्णतेचा त्रास होणार हे ध्यानात होतं आणि त्यानुसारच व्यायाम आणि आहार घेतला.
शरीरसौष्ठव तुझ्यासाठी काय आहे आणि या खेळातील युवा खेळाडूंना तू काय सांगशील ?
शरीरसौष्ठव हे माझं ‘वेड’ आहे, तोच श्वास आणि ध्यास आहे. शरीरसौष्ठवाशिवाय मी काहीच नाही. आता मी अशा उंचीवर पोहोचलो आहे की, सारेच माझ्याकडे आदराने आणि आशेने बघतात. या खेळात वळणाऱ्या युवा पिढीला मी फक्त एवढेच सांगने की, तुमच्या कामाशी तुम्ही प्रमाणिक राहा. तुम्हाला यश मिळणारच. यशाचा कोणताही ‘शार्टकट’नसतो आणि असला तरी तो फसवा मार्ग असतो. त्यामुळे खेळाशी प्रामाणिक राहून योग्य व्यायाम आणि आहार घेतलात तर यश तुमचेच आहे. पण एखाद-दुसऱ्या विजेतेपदाने हुरळून जाऊ नका, कामगिरीत सातत्य राखणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.
यापुढे कोणती ध्येय तुझ्या समोर आहेत आणि त्यासाठी काय तयारी करणार आहे ?
आता ‘मि. युनिव्हर्स आणि ‘मि. ऑलिम्पिया’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धा डोळ्यापुढे आहेत आणि या स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचे माझे ध्येय आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून ‘प्रो-कार्ड’ मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन, कारण हे कार्ड मिळवल्यावर मोठय़ा स्तरावरच्या स्पर्धा खेळू शकतो. अरनॉल्ड श्वेझनेगर हा माझा या खेळातील आदर्श आहे, दैवतंच म्हणा ना. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर जी देदीप्यमान कामगिरी केली तशीच कामगिरी करण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे या स्पर्धासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मी करेन. आतापर्यंत आणि यापुढेही देशाचे आणि खेळाचे नाव उंचावण्याचा माझा प्रयत्न असेल.
सुहास खामकर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
मुंबई : तामिळनाडू बॉडी बिल्डिंग संघटनेतर्फे आयोजित ५३व्या मिस्टर इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुहास खामकरने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण जेतेपदावरही कब्जा केला. महिलांमध्ये ८व्या फिटनेस अजिंक्यपदाचा मान पश्चिम बंगालच्या दीप्रींना भट्टाचारीने मिळवला. पश्चिम बंगालने सर्वसाधारण जेतेपद पटकावले. महाराष्ट्रातील दुर्गा जाधव आणि विद्या श्रीसत्र या दोघींनी रौप्यपदक मिळवले. ५५ किलो : सुनील सपकाळ, सोनू, रोशन तटकरे, भारत जाधव, पी.पेरवाल. ६० किलो : जयसिंग, करणजीतसिंह, अजू घोष, संजीवकुमार. ६५ किलो : एम. कोठनदर्शन, हरीराम, अशोककुमार, इम्रान मेवेकरी, संजय श्रीव्हास. ७० किलो : रवीकुमार, विजय मोरे, अंबर शर्मा, सचिन पाटील, के. अरुणाचलम. ७५ किलो : आशिष साखरकर, अब्दुल अश्रप, मनजीत शकुन, सचिन वाय. पाटील, जय दाभाडे. ८० किलो : सुहास खामकर, एन.जी. रणधीर, प्रणय लोंढे, पवनकुमार, टी. शिवशंकर. ८५ किलो : ब्रोव्हन युमनाम, तेजिंदरसिंग, अमीन चौधरी, सकुमार, महेशराव