Brett Lee Praises Jasprit Bumrah : पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाने तयारी सुरु केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाची पहिली तुकडी येत्या काही दिवसांत न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. भारतीय संघ या जागतिक स्पर्धेत दोन तुकड्यांमध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहे. कारण संघात समाविष्ट असलेले काही खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफ खेळत आहेत. या स्पर्धेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतासाठी महत्त्वाचा ठरेल, ज्याने या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने बुमराहचे खूप कौतुक केले आहे.
आयपीएल २०२४ मध्ये बुमराहने केले प्रभावित –
जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या हंगामात त्याच्या संघाची कामगिरी खूपच खराब होती. मुंबई संघाने १४ सामन्यांत चार विजय आणि १० पराभवांसह गुणतालिकेत तळाच्या १०व्या स्थानावर राहिला. मात्र, बुमराहने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत चांगली कामगिरी केली. बुमराहने या हंगामातील १३ सामन्यांमध्ये एकूण २० विकेट्स घेतल्या आणि या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ६.४८ होता. बुमराह विश्वचषकात टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल आणि नवीन चेंडूने संघाला यश मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.
ब्रेट लीने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक –
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने जिओ सिनेमावर बोलताना बुमराहचे कौतुक केले. तो म्हणाला की, जसप्रीत बुमराह कुठेही गोलंदाजी करू शकतो. बुमराहमध्ये बर्फातही गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. कारण तो तितका प्रभावी गोलंदाज आहे. बुमराहमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची ताकद आहे. तो टी-२० विश्वचषकासाठी संघात असेल आणि तो शानदार गोलंदाजी करेल.
टी-२० मध्ये चेंडू आणि बॅटमध्ये समान संतुलन राखण्याचा सल्ला –
ब्रेट लीने टी-२० क्रिकेटमध्ये बॉल आणि बॅटमध्ये समान संतुलन राखण्याचा सल्ला दिला आहे. खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या ठेवण्याचे आवाहनही त्याने आयोजकांना केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान ब्रेट ली म्हणाला की, त्याला क्रिकेटमध्ये षटकार मारताना पाहणे आवडते, पण गोलंदाजांनीही सामन्यात टिकून राहिले पाहिजे. तो म्हणाला, मी सर्वत्र हिरव्या विकेटची मागणी करत नाही. संघ १०० किंवा ११० धावांत ऑलआऊट झाला तर क्रिकेटसाठी ते चांगले होणार नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाला एक गुण मिळवायचा आहे आणि मला वाटते की १८५ ते २३० दरम्यान धावसंख्या चांगला स्कोअर आहे.