ऑस्ट्रेलिया अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर या मालिकेतील तिसरा अनधिकृत वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३१८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने २ गडी राखून विजयाची नोंद केली आहे. यासह मालिका २-१ ने खिशात घातली आहे.
युवराज सिंगच्या तालमीत घडलेल्या खेळाडूचं दमदार शतक
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ३१८ धावा करायच्या होत्या. भारतीय अ संघाकडून फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगने दमदार सलामी दिली. गेल्या सामन्यात स्वस्तात माघारी परतलेला अभिषेक शर्मा या डावातही लवकर बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या प्रभसिमरन सिंगने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य आणि अनमोलप्रीत हे युवराज सिंगच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत. अभिषेक शर्माने आशिया चषक स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला. आता ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंगने ६६ चेंडूंचा सामना करत दमदार शतक झळकावलं आहे. अभिषेक शर्मा, शुबमन गिल, प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत हे खेळाडू लॉकडाऊन असताना युवराज सिंगच्या राहत्या घरी जाऊन क्रिकेटचा सराव करायचे. त्यामुळे प्रभसिमरनच्या यशात देखील युवराज सिंगचा मोलाचा वाटा आहे.
भारतीय संघाचा दमदार विजय
या सामन्यात सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने २२ धावांची खेळी केली. प्रभसिमरन सिंगने १०२, तिलक वर्माने ३, कर्णधार श्रेयस अय्यरने ६२, रियान परागने ६२, आयुष बदोनीने २१ धावांची खेळी केली. शेवटी विपराज निगम २४ धावांवर नाबाद राहिला. तर अर्शदीप सिंगदेखील ७ धावांवर नाबाद राहिला. यासह भारतीय संघाने हा सामना २ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला.