India Enters Asia Cup 2025 Final: आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. भारताने बांगलादेशला १२७ धावांवर सर्वबाद करत ४१ धावांनी शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने या सामन्यात अनेक झेल सोडले आहेत, ज्याचा फटका संघाला बसला होताच; पण भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. या विजयासह टीम इंडिया १२ व्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर श्रीलंकेचा संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
टीम इंडियाच्या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव ठरले, ज्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. अभिषेक शर्माने फक्त ३७ चेंडूत ७५ धावा केल्या, तर कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारतीय संघ आता २६ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध सुपर फोरमधील शेवटचा सामना खेळेल. हा सामना केवळ औपचारिकता असेल, कारण भारतीय संघ आधीच फायनलमध्ये पोहोचला आहे.
टीम इंडियाने बांगलादेशला केलं सर्वबाद अन् एकतर्फी विजय मिळवला
१६९ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने तांझिड हसनला झटपट गमावलं, पण सैफ होसेनने झुंजार खेळी केली. चार जीवदानांचा पुरेपूर फायदा उठवत सैफने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६९ धावांची वेगवान खेळी केली. एका बाजूने सातत्याने सहकारी तंबूत परतत असतानाही सैफने फटकेबाजीत कोणतीही हयगय केली नाही. परवेझ इमॉनने २१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी विकेट्स घेतानाच धावांनाही वेसण घातली. सैफला सहकाऱ्यांची साथ मिळाली असती तर सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं.
भारतीय संघाने आज अर्धा डझन झेल सोडले. सुदैवाने याचा निकालावर परिणाम झाला नाही पण एकाक्षणी बांगलादेश सामना जिंकू शकतंय अशी स्थिती होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने फिरकीपटूंचा अचूक उपयोग करून घेत सामना भारतीय संघच जिंकेल याची काळजी घेतली. भारताकडून कुलदीप यादवने १८ धावांत ३ तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. धावगती वाढत असताना बुमराहला मोठा फटका मारण्याचा सैफचा प्रयत्न अक्षर पटेलच्या हातात जाऊन विसावला आणि भारतीय खेळाडूंनी सुस्कारा टाकला.
सैफ आणि इमॉनचा अपवाद वगळता बांगलादेशच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भागीदारी करता न येणं हे बांगलादेशच्या पराभवाचं कारण ठरलं. घाऊक जीवदानांचा फायदा सैफला उठवता आली नाही.बाद होण्यापूर्वी त्याने बांगलादेशच्या विजयाच्या आशा जिवंत राखल्या होत्या. तो बाद होताच भारतीय संघाने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. डावखुऱ्या फलंदाजाने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आणि टीम इंडियाला २० षटकांत १६८ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. भारताच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा शानदार सुरूवात करून दिली. अभिषेक शर्माने फक्त २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर इतर मोठे फलंदाज फेल ठरले. चांगली सुरुवात असूनही गिल २९ धावांवर बाद झाला. शिवम दुबे २ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव फक्त ५ धावा करू शकला. तिलक वर्मा ५ आणि अक्षर पटेल १० धावा करत माघारी परतला. तर हार्दिक पंड्याने ३८ धावांची उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला १६० धावांचा आकडा पार करून दिला. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने २ विकेट्स तर सैफुद्दिन, मुस्तफिजूर आणि तंजीम यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.