Team India Playing 11 Prediction, IND vs AUS: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला रंगणार आहे. भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.यासह विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी देखील ८ महिन्यांनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्माचं पुनरागमन झाल्यानंतर कशी असेल भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११? जाणून घ्या.
कसा असेल फलंदाजी क्रम?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात येईल. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. त्यामुळे सुरूवातीच्या ५ फलंदाजांमध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.
कोणत्या वेगवान गोलंदाजांना मिळणार संधी?
या मालिकेसाठी हार्दिक पंड्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. यासह अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळणार हे निश्चित आहे. तर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणाला संधी दिली जाऊ शकते.
वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली, तर कुलदीप यादवला संधी मिळणं खूप कठिण आहे. तर हर्षितला संधी दिली, तर प्रसिध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. गिल आणि रोहितची जोडी डावाची सुरूवात करणार आहे. त्यामुळे जैस्वालला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं देखील खूप कठिण आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलला संधी दिली गेली आहे. पण केएल राहुल असताना, जुरेलला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.