ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत पराभव स्विकारावा लागल्यानंतर, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्याची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी हैदराबादच्या मैदानावर हा पहिला सामना खेळवण्यात येईल. मात्र या सामन्याआधीच भारतीय गोटामध्ये चिंतेच वातावरण पसरलं आहे. संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी नेट्समध्ये सराव करत असताना दुखापतग्रस्त झाल्याचं समजत आहे. सरावादरम्यान धोनीच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धोनीने सर्वप्रथम नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करण्यावर भर दिला. यावेळी एक चेंडू अनपेक्षितपणे उसळी घेऊन धोनीच्या हातावर आदळला. या घटनेनंतर धोनी दुखापतीमुळे त्रस्त दिसत होता, यानंतर त्याने सराव थांबवण पसंत केलं. धोनीला झालेली दुखापत गंभीर आहे की नाही यावर संघ व्यवस्थापनाने अजुनही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.