Suryakumar Yadav Gets Angry On Shivam Dube: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. यासह मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. या सामन्यात संघाचा कर्णधाा सूर्यकुमार यादवला फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या २० धावा करत माघारी परतला. दरम्यान या सामन्यात तो आपल्या फलंदाजीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

सूर्यकुमार यादव हा आपल्या कूल आणि मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. तो सहसा संघातील खेळाडूंवर रागावताना दिसत नाही. पण चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान तो संघातील खेळाडूंवर रागावताना दिसला. तर झाले असे की, १२ वे षटक टाकण्यासाठी शिवम दुबे गोलंदाजीला आला. या षटकात गोलंदाजी करताना त्याने टीम डेव्हिडला बाद करत माघारी धाडलं. त्याने चांगली गोलंदाजी करत मार्कस स्टोइनिसला २ निर्धाव चेंडू टाकले. त्यामुळे मार्कस स्टोइनिसवरील दबाव वाढत चालला होता. पण षटकातील शेवटी त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर स्टोइनिसने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकार मारला. हे सूर्यकुमार यादवला मुळीच आवडलं नाही. त्यामुळे तो शिवम दुबेवर संताप व्यक्त करताना दिसला.

पण स्टोइनिस फार काही करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १६८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या मिचेल मार्शने ३० धावांची खेळी केली. तर मॅट शॉर्टने २५ , जोश इंग्लिसने १२ धावांची खेळी केली. शेवटी टीम डेव्हिडने १४, जोश फिल्पीने १० आणि मार्कस स्टोइनिसने अवघ्या १७ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने २८ आणि शुबमन गिलने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने २२, सूर्यकुमार यादवने २० धावांची खेळी केली. शेवटी फलंदाजी करताना अक्षर पटेलने २१ धावा करत संघाची धावसंख्या ८ गडी बाद १६७ धावांवर पोहोचवली.