Virat Kohli Record, India vs Australia: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास असणार आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी ८ महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. यादरम्यान विराट कोहलीला हा सामना आणखी खास बनवून एक मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ५१ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर विराट कोहलीने देखील ५१ शतकं झळकावून या विक्रमाची बरोबरी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या ३ सामन्यांमध्ये त्याने १ शतक झळकावलं तर तो वनडे क्रिकेटमध्ये ५२ शतकं झळकावणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ २ असे फलंदाज आहेत ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ५० हून अधिक शतकं झळकावली आहेत. हे दोन्ही फलंदाज विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर आहेत. दोघांच्या नावे ५१ शतकं झळकावण्याची नोंद आहे.
ऑस्ट्रेलियात विराट कोहलीची कारकिर्द
ऑस्ट्रेलियात खेळताना विराट कोहलीने नेहमीच धावांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियात खेळताना त्याला २९ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ५१.०३ च्या सरासरीने १३२७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली आहेत. मुख्य बाब म्हणजे विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात खेळताना गेल्या पाचही डावात जबरदस्त कामगिरी केली आहे. यादरम्यान त्याने ५४,५६,८५,५४ आणि ८४ धावा केल्या आहेत. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा हा विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा दौरा असू शकतो. या दौऱ्यावर तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.