रविवारी (दि. २५ डिसेंबर) ख्रिसमसच्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवला. यासोबतच भारताने ही मालिका २-०ने खिशात घातली. भारताने दुसऱ्या कसोटीत ३ विकेट्सने विजय मिळवत बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना न हारण्याचा विक्रम कायम ठेवला. विशेष म्हणजे, रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या केएल राहुल याने मालिका विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राहुलने स्पष्टपणे ड्रेसिंग रूममधील परिस्थिती सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सात गडी गमावूनही त्याचा आपल्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास होता. भारताने सकाळची सुरुवात ४ बाद ४५ अशी केली होती पण तीन झटपट गमवावे लागल्याने त्यांची ७ बाद ७४ अशी अवस्था झाली होती. श्रेयस अय्यर (४६ चेंडूत नाबाद २९) आणि रविचंद्रन अश्विन (६६ चेंडूत नाबाद ४२) यांनी ७१ धावांची भागीदारी करून भारताला चौथ्या दिवशी उपाहारापूर्वी लक्ष्य गाठले.

आम्हीपण शेवटी माणसं आहोत

राहुल सामन्यानंतर म्हणाला, “तुम्हाला खेळपट्टीवर असणाऱ्या तुमच्या फलंदाजांवर विश्वास दाखवावा लागेल. आमचा त्याच्यावर विश्वास होता पण घाबरलो होतो, शेवटी आम्ही पण माणसं आहोत. पण आमचा आमच्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास होता आणि तो त्यांनी सार्थ ठरवला. आज अश्विन आणि श्रेयसने आपली भूमिका चोख बजावली. त्याने शानदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. कोणत्याही क्षणी विजय सोपा होईल असे आम्ही मानणार नव्हतो. आम्हाला माहित होते की आम्हाला धावा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.”

हेही वाचा: KL Rahul: टी२० संघातून केएल राहुलचा गुंडाळला जाणार गाशा , चेतन शर्माच निवडणार श्रीलंका मालिकेसाठी संघ

आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त विकेट गमावल्या

केएल राहुल म्हणाला, “नव्या चेंडूवर धावा करणे अधिक कठीण झाले असते. आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त विकेट गमावल्या. आमच्याकडून चुका झाल्या पण आम्ही त्यातून शिकू आणि भविष्यात आम्ही अशा परिस्थितीत आणखी चांगली कामगिरी करू अशी आशा आहे.”

राहुलने गोलंदाजांची स्तुती केली

रोहित शर्माच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या राहुलनेही आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, “मालिका जिंकल्याने आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजांना कसे तयार केले आहे हे दिसून येते. अश्विन आणि अक्षर पटेल यांनीही चांगली कामगिरी केली. उमेश यादवने आपले काम चोख बजावले. जयदेव उनाडकट बर्‍याच दिवसांनी परतला पण त्याने शानदार गोलंदाजी केली आणि तो अधिक विकेट्स घेण्यास पात्र आहे. मात्र अश्विन आणि अक्षर यांनी निर्माण केलेल्या दडपणाचा फायदा उठवला.”

मालिकेत फ्लॉप ठरला राहुल

या संपूर्ण मालिकेत केएल राहुल फलंदाजीत फ्लॉप ठरला. त्याने २ सामन्यातील एकूण ४ डावात ५७ धावा चोपल्या. कर्णधार म्हणून त्याची ही कामगिरी खूपच चिंताजनक आहे. त्याने फक्त या मालिकेतच नाही, तर या वर्षात कसोटीत फक्त १७.१२च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. राहुलने यावर्षी एकूण ४ सामने खेळताना 8 डावांमध्ये १३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला फक्त एक अर्धशतक करण्यात यश आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban why did kl rahul say after conquering the fort in mirpur after all we are also humans avw
First published on: 25-12-2022 at 15:58 IST