scorecardresearch

Ind vs Eng 1st T20 : आजपासून रंगणार टी-२० मालिका; जाणून घ्या संभाव्य संघ आणि खेळपट्टी

Excerpt: Ind vs Eng 1st T20 Playing 11 : भारत आणि इंग्लंड टी २० मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

India vs England 1st t20 Playing 11
भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी प्लेइंग ११ (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

India vs England t20 Playing 11 : एजबस्टन येथील एकमेव कसोटी सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (७ जुलै) साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बर्मिंगहॅममधील पाचव्या कसोटीतून बाहेर पडलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात मैदानावर परतणार आहे. मात्र, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे आजच्या सामन्यात खेळणार नाहीत. दुसऱ्या टी-२० सामन्यात ते संघात सामील होतील.

रोहित शर्माचे पुनरागमन आणि दीपक हुडाची धडाकेबाज फलंदाजी लक्षात घेता ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनला आजच्या सामन्यात संधी मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. या सामन्यात रोहितसोबत ईशान किशन सलामीला येताना दिसेल. तर, हुडा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेले राहुल त्रिपाठी आणि अर्शदीप सिंग यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी संघात स्थान मिळालेले नाही. आजच्या सामन्यातही त्यांना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. दुखापतीनंतर आयर्लंडविरुद्ध पुनरागमन करणाऱ्या सुर्यकुमार यादवला मालाहाइडमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे निदान इंग्लंडविरुद्ध तरी त्याने चांगली खेळी करावी, अशी त्याच्याकडून अपेक्षा असेल.
इंग्लंड संघाबाबत बोलायचे झाले तर इयॉन मॉर्गनने नुकतीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व जोस बटलरकडे देण्यात आले आहे. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांना विश्रांती देण्यात आली आहे. असे असले तरी यजमान संघाकडे स्फोटक फलंदाजांची कमतरता नाही. डेव्हिड मलान सोबत, लियाम लिव्हिंगस्टोन देखील भारतीय संघासाठी घातक ठरू शकतात.

हेही वाचा – IND vs WI ODI Series : ‘विश्रांती दिली तर फॉर्म परत येईलच कसा?’ विराट आणि रोहितला वगळल्याने माजी भारतीय गोलंदाजाने उपस्थित केला प्रश्न

हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६५ आहे. उत्सुकतेची बाब म्हणजे या हंगामातील सातपैकी पाच सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. दरम्यान, आज येथील खेळपट्टी गोलंदाजांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
द रोज बाऊल हे जगातील सर्वात लांब सीमारेषा असलेल्या मैदानांपैकी एक आहे. अशा स्थितीत दोन्ही संघातील कोणते फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडण्यात यशस्वी होणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, दीपक हुडा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह/आवेश खान/उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

संभाव्य इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जेसन रॉय, डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक, सॅम करेन/डेव्हिड विली, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन/रीस टॉपली/टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किंसन

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng 1st t20 india playing 11 vs england predicted squad venue pitch report vkk