IND vs ENG 3rd test Day 2 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भारतीय संघ गोलंदाजी करत आहे. पहिल्या डावात भारताने इंग्लंडला ३८७ धावांवर सर्वबाद केलं आहे. भारताकडून बुमराहने ५ विकेट्स, सिराज-नितीश रेड्डीने प्रत्येकी २ विकेट तर जडेजाने १ विकेट मिळवली. तर भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ विकेट्स गमावत ३ बाद १४५ धावा केल्या आहेत. केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावलं, तर दुखापतीनंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी उतरला आहे. राहुल ५३ धावा तर पंत १९ धावा करत नाबाद परतले आहेत.
शुबमन गिल झेलबाद
भारताचा कर्णधार शुबमन गिल कसोटी मालिकेत कमालीचा फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत २ सामने आणि एका डावात ६०० अधिक धावा केल्या आहेत. पण गिलला वोक्सने झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. गिल ४३ चेंडूत १६ धावा करत बाद झाला. यासह भारताने आतापर्यंत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. शुबमन गिलच्या बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि विकेटकिपरही विकेटच्या एकदम जवळ आणलं आणि गिलसाठी सापळा रचत त्याला झेलबाद केलं.
करूण नायर पुन्हा अपयशी
करूण नायरने केएल राहुलबरोबर ६१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला होता. पण जो रूटच्या कमालीच्या झेलमुळे करूण नायर पुन्हा एकदा चांगल्या सुरूवातीनंतर झेलबाद झाला. नायरने ६२ चेंडूत ४ चौकारांसह ४० धावा केल्या.
टीब्रेक
भारतीय संघाने डावाच्या सुरूवातीला यशस्वी जैस्वालच्या रूपात पहिली विकेट गमावली. जैस्वाल ३ चौकार लगावत १३ धावा करत बाद झाला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. पण राहुल आणि करूणने संयमाने फलंदाजी करत विकेट गमावली नाही आणि भारताचा डाव पुढे नेला. यासह भारताने टीब्रेकपर्यंत एक विकेट गमावत ४४ धावा केल्या आहेत. केएल राहुल १३ तर करूण नायर १८ धावा करत माघारी परतले.
आर्चरच्या खात्यात पहिली विकेट
जोफ्रा आर्चरने ४ वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केलं आणि पहिल्या षटकात त्याने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. आर्चरने तिसऱ्या चेंडूवर जैस्वालला स्लिपमध्ये झेलबाद केलं.
ब्रायडन कार्सचं अर्धशतक
इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्स याने तिसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी करत त्याचं पहिलं कसोटी अर्धशतक झळकावलं. कार्सने ७६ चेंडूत ५२ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
जसप्रीत बुमराह ५ विकेट
जसप्रीत बुमराहने जोफ्रा आर्चरला क्लीन बोल्ड करत भारताला नववी विकेट मिळवून दिली आणि ५ विकेट्सही घेतल्या. बुमराहने पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानावर पाच विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. बुमराहने इंग्लंडविरूद्ध हेडिंग्ले कसोटीतही पाच विकेट्स घेतल्या होते आणि तिसऱ्या कसोटीतही त्याने हा पराक्रम केला.
जसप्रीत बुमराहने जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर यांना क्लीन बोल्ड केलं. तर ख्रिस वोक्सला झेलबाद करत ५ विकेट्स मिळवले.
जेमी स्मिथ विकेट
लंचब्रेकनंतर मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात जेमी स्मिथला झेलबाद केलं. सिराजे टाकलेला चेंडू स्मिथ खेळायला गेला आणि बॅटची कड घेत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळाली.
लंचब्रेक
लॉर्ड्स कसोटी दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला असून भारताला बुमराहच्या ३ विकेट्स व्यतिरिक्त इंग्लंडला सर्वबाद करण्यात यश मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी चेंडूवर झालेल्या गोंधळामुळे इंग्लंडच्या ब्रायडन कार्स आणि जेमी स्मिथ यांना संघाचा डाव सावरण्यात मदत मिळाली. स्मिथ आणि कार्सने ८२ धावांची भागीदारी रचली. यासह लंचब्रेकपर्यंत इंग्लंडने ७ बाद ३५३ धावा केल्या आहेत.
जेमी स्मिथचं अर्धशतक
बुमराहने दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला ३ विकेट्स घेत इंग्लंडला मोठे धक्के दिले. पण यानंतर जेमी स्मिथने पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव सावरला. स्मिथने दुसऱ्या कसोटीतही शानदार खेळी केली होती. स्मिथला ब्रायडन कार्सने चांगली साथ देत दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली आहे.
बुमराहचे २ चेंडूत २ विकेट
जसप्रीत बुमराहने ८८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शतकवीर जो रूटचा त्रिफळा उडवला आणि भारताला मोठी विकेट मिळवून दिली. यासह बुमराहने रूटला ११व्यांदा कसोटीत बाद केलं आहे. तर दुसऱ्या चेंडूवर बुमराहने वोक्सला झेलबाद केलं. बुमराहने टाकलेला चेंडू बॅटची कड घेत जुरेलच्या हातात गेला आणि भारताने रिव्ह्यू घेतला आणि सातवी विकेट मिळवली.
बुमराहच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स क्लीन बोल्ड
जसप्रीत बुमराहने ८६व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बेन स्टोक्स क्लीन बोल्ड केलं आहे. बुमराहच्या पहिल्या चेंडूवर स्टोक्सने कमालीचा तौकार खेचला आणि पुढच्याच चेंडूवर बुमराहने त्याला बोल्ड करत भारताला दुसऱ्या दिवशी पहिली विकेट मिळवून दिली आहे. यासह इंग्लंडचा निम्मा संघ आता तंबूत परतला आहे.
जो रूटचं शतक
इंग्लंड संघाचा अनुभवी फलंदाज जो रूटने आपलं ३७वं कसोटी शतक झळकावलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर जोखीम पत्करत त्याने चौकार लगावला आणि १९२ चेंडूत १० चौकारांसह आपलं शतक पूर्ण केलं.
ऋषभ पंत दुखापतीचे अपडेट
बीसीसीआयने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी अपडेट दिले आहेत. डाव्या हाताच्या तर्जनीला झालेल्या दुखापतीतून ऋषभ पंत अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.
ऋषभ पंत-बेन स्टोक्स दुखापत
ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या तर्जनी (इंडेक्स फिंगर) ला यष्टीरक्षण करताना दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो डॉक्टर आणि भारताच्या सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तो मैदानात उतरणार की नाही, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला पहिल्या दिवशी फलंदाजीदरम्यान ग्रोईनमध्ये दुखापतीचा त्रास होत असल्याचे दिसून आलं. त्यामुळे विकेटदरम्यान धावा घेताना त्याला अडचण येत होती. आता दुसऱ्या दिवशी स्टोक्स जो रूटसोबत मैदानात उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडलं?
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. मात्र, भारताकडून नितीश रेड्डीने १४व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत संघाला पहिल्या सत्रात मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला.
यानंतर भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्याच्या जागी आलेल्या ध्रुव जुरेलने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऑली पोपचा अप्रतिम झेल घेतला.
यानंतर जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करत भारताला आणखी एक विकेट मिळवून दिली. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला फलंदाजी करताना ग्रोईनमध्ये दुखापतीचा त्रास होत असल्याचं दिसून आलं. पहिल्या दिवशी जो रूट ९९ धावा करून, तर बेन स्टोक्स ३९ धावा करून माघारी परतले.