IND vs ENG Edgbaston Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली एजबस्टन कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. सामन्याच्या दुसऱ्या फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. तर, भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर तीन बाद १२५ धावा केल्या. त्यामुळे भारताकडे धावांची आघाडी आली आहे. दरम्यान, सामन्याचा तिसरा दिवस विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोच्या वादामुळे गाजला. जॉनी बेअरस्टो शतक करून बाद झाल्यानंतर तर विराट कोहलीने अनोख्या पद्धतीने त्याला निरोप दिला. त्याच्या या करामतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

विराट कोहली आणि बेअरस्टोचा वाद झाल्यानंतर तो जास्त आक्रमक खेळला. शमीने त्याला बाद करण्यापूर्वी त्याने शानदार शतक (१०६) ठोकले. योगायोगाने, विराट कोहलीनेच दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा झेल घेतला. बेअरस्टोचा झेल टिपल्यानंतर भारताच्या माजी कर्णधाराने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. झेल घेतल्यानंतर कोहलीने उजवीकडे वळत माघारी जाणाऱ्या जॉनी बेअरस्टोला फ्लाइंग किस दिला.

इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ३२व्या षटकात विराट आणि जॉनी दरम्यान वाद झाला होता. विराट कोहली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. शामीने फेकलेला चेंडू बेअरस्टोच्या अंगावर लागला. त्यानंतर विराट कोहली बेअरस्टोला काहीतरी बोलला. बेअरस्टोनेही त्याला उत्तर दिले. यानंतर विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test: “काळजी करू नका आम्ही आज रात्री एकत्र जेवणार!”, जॉनी बेअरस्टोने टाकला वादावर पडदा

दोघांना शांत करण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पंच अलीम दार आणि रिचर्ड केटलबरो यांनी कोहली आणि बेअरस्टोला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर वातावरण थोडे शांत झाले. शामीचे षटक संपल्यानंतर कोहली आणि बेअरस्टो एकमेकांशी हसत बोलताना दिसले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर बेअरस्टोने देखील आपली प्रतिक्रिया देऊन वादावर पडदा टाकला.