टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २२ धावांनी मात करत वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २७४ धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करत चांगली झुंज दिली…पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.

अवश्य वाचा – Ind vs NZ : जाडेजाची अपयशी झुंज, मात्र मोडला धोनीचा विक्रम

मोहम्मद शमीच्या जागी दुसऱ्या वन-डे सामन्यात नवदीप सैनीला संधी देण्यात आली. सैनीनेही १० षटकांत ४८ धावा दिल्या, मात्र एकही बळी घेण्यात तो अपयशी ठरला. गोलंदाजीतली कसर सैनीने फलंदाजीतही भरुन काढली. रविंद्र जाडेजासोबत भागीदारी रचतना नवदीप सैनीने ४९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश होता.

SENA देशांविरोधात वन-डे क्रिकेटमध्ये नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सैनी दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

पहिल्या वन-डे प्रमाणे दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात ५२ धावा केल्या. याव्यतिरीक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.

Story img Loader