भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या मैदानावर कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चांगली गोलंदाजी केली. शिवाय वृद्धिमान साहाचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या यष्टीरक्षक केएस भरतनेही आपली जादू दाखवली. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना भरतने एक चूक केली, ज्यामुळे रवीचंद्रन अश्विननेही सामन्यानंतर त्याला गमतीशीर पद्धतीने जाब विचारला.

कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना आपला बळी बनवले, तर आर अश्विनला तीन बळी मिळाले. श्रीकर भरतने दोन उत्कृष्ट झेल घेतले आणि एक यष्टीचीतही केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर हे तिघे एकत्र आले होते, यावेळी त्यांनी संवाद साधला. बीसीसीआयने या तिघांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा – IND vs NZ : मुंबईच्या क्रिकेटप्रेमींसाठी ‘गोड’ बातमी..! वानखेडे स्टेडियम होणार खुलं; ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार एन्ट्री!

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम ६६ धावांवर खेळत असताना फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने त्याला पायचीत पकडले. भारतीय क्षेत्ररक्षकांनीही अपील केले. मात्र, मैदानावरील पंचांनी भारताच्या बाजूने निर्णय दिला नाही. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणेनेही रिव्ह्यू घेतला नाही आणि श्रीकर भरतनेही रिव्ह्यू न घेण्याबाबत मत दिले. पण हा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध झाले, कारण रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले, की चेंडू मधल्या यष्टीवर आदळत होता.

लॅथमला अक्षर पटेलने ९५ धावांवर बाद केले. लॅथमची खेळी भारताला लवकर संपुष्टात आणता आली असती, मात्र डीआरएस न घेतल्यामुळे तो जास्त वेळ मैदानावर उभा राहिला. यानंतर अश्विनने भरतला या रिव्ह्यूबाबत प्रश्न विचारला. ”फलंदाज स्पष्टपणे बाद असताना तू मला रिव्ह्यू घेण्यापासून का थांबवले”, असा सवाल अश्विनने भरतला विचारला. यावर भरत म्हणाला, ”मला माफ कर. मला इतका विश्वास होता, की तो चेंडू त्याच्या बॅटला लागला, पण जेव्हा आम्ही तो चेंडू स्लो-मोशनमध्ये पाहिला. तेव्हा तो त्याच्या पुढच्या पॅडवर आणि नंतर बॅक पॅडवर आदळला. त्याबद्दल मला खूप खेद वाटत आहे.”