एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बरोबरीत समाधान मानावं लागलं असलं, तरीही महिला संघाने आफ्रिकेविरुद्ध मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी मात केली आहे. या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला १-० अशा आघाडीवर आहेत.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेची कर्णधार सुने लुसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवातही अडखळती झाली. आपल्या कारकिर्दीचा पहिलाच सामना खेळणारी शाफाली वर्मा भोपळाही न फोडता माघारी परतली, शबनिम इस्माईलने तिचा बळी घेतला. यानंतर मराठमोळी स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी छोटेखानी भागीदारी करत भारतीय महिला संघाचा डाव सावरला. मात्र चांगल्या फॉर्मात असलेली स्मृती मंधाना २१ धावा काढून माघारी परतली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या सहकाऱ्यांना हाताशी धरत भारताला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. एकीकडे भारतीय फलंदाज माघारी परतत असताना हरमनप्रीतने ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ४३ धावांची खेळी केली. २० षटकांत १३० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय महिलांनी आफ्रिकेला विजयासाठी १३१ धावांचं आव्हान दिलं.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आफ्रिकन महिला संघाची सुरुवात आश्वासक झाली होती. लिझेल ली आणि टॅझमिन ब्रिट्स यांनी भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना केला. मात्र शिखा पांडेने २५ धावांवर लीचा त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यापोठापाठ टॅझमिन ब्रिट्सही दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतली. यानंतरच्या दोन आफ्रिकन फलंदाजही हजेरी लावून माघारी परतल्यामुळे भारतीय महिलांनी अनपेक्षितपणे सामन्यात पुनरागमन केलं.
यानंतर मैदानात आलेल्या मिग्नॉन डू-प्रिझने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली. तिला तिच्या इतर सहकाऱ्यांकडून फारशी साथ मिळत नसतानाही डू-प्रिझने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत अर्धशतकी खेळी केली. डू-प्रिझने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात आफ्रिकेच्या महिलांना विजयासाठी १२ धावांची गरज असताना डू-प्रिझ आणि एन.म्लाबा ही खेळाडू राधा यादवच्या गोलंदाजीवर माघारी परतली. अखेरीस सामन्यात ११ धावांनी विजय मिळवत भारतीय महिलांनी मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. भारताकडून दिप्ती शर्माने ३, शिखा पांडे-पूनम यादव आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ तर हरमनप्रीत कौरने एक बळी घेतला.