शिवम मावीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करताना २२ धावांत ४ बळी घेतले. त्यामुळे हा सामना २ धावांच्या फरकाने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करतााना १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ १६० धावाच करू शकला. या सामन्यानंतर शिवम मावीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारताकडून दीपक हुड्डा, इशान किशन आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर शिवम व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनीही २-२ बळी घेतले. टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुरुवार, ५ जानेवारी रोजी होणार आहे. बीसीसीआयने शिवम मावीसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

यामध्ये शिवम मावीने आपल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. आपल्या कामगिरीबाबत तो म्हणाला की, ”जेव्हा मी मैदानात आलो, तेव्हा स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटले. गेल्या ६ वर्षांपासून मी याची वाट पाहत आहे. मी यापूर्वी दुखापतीने त्रस्त होतो.” याच कारणामुळे तो फिटनेससाठी खूप मेहनत घेत होता.

गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी त्याला विचारले की, पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करून तो काय विशेष करणार आहे. कोणाशी बोलणार? यावर मावी म्हणाला की, ”मी घरच्यांशी कॉलवर बोलून झोपणार आहे. कारण पुढचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे.”

पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्स घेणारा मावी भारताचा तिसरा गोलंदाज –

नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याबाबत, मावी म्हणाला की, त्याची नजर विकेट घेण्यावर असते. शिवम पहिल्या सामन्यातही अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. ४ षटकांत प्रत्येकी एक विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. याआधी बरिंदर स्रान आणि प्रग्यान ओझा यांनी भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात ४-४ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता अशी कामगिरी करणारा मावी भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच दिवसात ३ टी-२० सामने –

भारताला श्रीलंकेविरुद्ध ५ दिवसांत ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. दुसरा सामना पुण्यात ५ जानेवारीला तर शेवटचा सामना राजकोटमध्ये ७ जानेवारीला होणार आहे. यानंतर १० ते १५ जानेवारी या सहा दिवसांत उभय संघांमध्ये ३ वनडे सामने होणार आहेत. याआधीही व्यस्त वेळापत्रकावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.