India vs West Indies Pitch For 2nd Test: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्टइंडिजचा एकतर्फी धुव्वा उडवला. दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजचा संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. या मैदानावर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला, तर दुसरीकडे वेस्टइंडिजचे फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजांच्या फिरकीवर गरबा करताना दिसून आले. आता दुसऱ्या कसोटीआधी खेळपट्टी कशी असेल? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
पहिल्या कसोटीचा निकाल अवघ्या अडीच दिवसात
अहमदाबादमध्ये पार पडलेल्या या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वेस्टइंडिजचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला होता. वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. अहमदाबादची खेळपट्टी तयार करण्यासाठी लाल मातीचा वापर करण्यात आला होता. सुरूवातीला खेळपट्टीवर ४ मिलीमीटर इतकं गवत होतं. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना सुरूवातीला चांगली मदत मिळाली. याचा फटका वेस्टइंडिजच्या फलंदाजांना बसला. त्यानंतर भारताने ४४८ धावा करून डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइ़ंडिजचा दुसरा डाव अवघ्या १४६ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना १ डाव आणि १४० धावांनी आपल्या नावावर केला.
दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल खेळपट्टी?
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात खेळपट्टी ही फलंदाजासाठी अनुकूल असेल. तर वेगवान आऊटफिल्ड आणि बाऊंड्रीलाईन फार मोठी नसल्याने फलंदाजांना धावा करणं सोपं जाणार आहे. सुरूवातीचे ३ दिवस फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळेल.पण सामना जर चौथ्या आणि पाचव्या दिवसापर्यंत गेला, तर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. याआधी २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्याचा थरार रंगला होता. त्यावेळी भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ६ गडी राखून विजय मिळवून दिला होता.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव.
वेस्टइंडिजचा संघ:
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, एलिक अथेंज, जॉन कँपबेल, तेगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप (यष्टीरक्षक), टेविन इमलाच, अल्जारी जोसेफ, जोहान लेन, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खेरी पियरे, जेडन सील्स.