भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी २० मालिकेसाठी दुखापतग्रस्त शिखर धवन याच्या जागी युवा खेळाडू संजू सॅमसन याला संधी दिली आहे. नुकतीच BCCI ने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. शिखर धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी मूळ संघ जाहीर करण्यात आला होता पण त्या संघातून संजू सॅमसन याला वगळण्यात आले होते. देशांतर्गत स्पर्धा आणि IPL अशा दोनही ठिकाणी चांगली कामगिरी करूनदेखील संजू सॅमसन भारतीय संघात संधी नाही, यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण शिखर धवनची दुखापत संजू सॅमसन याच्या पथ्यावर पडली आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला. पण आता मूळ प्रश्न असा की त्याला अंतिम १५ च्या संघात स्थान दिले असले तरी तिला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार का?

संजू सॅमसन

भारताच्या टी २० संघात विराट कोहली, रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची यशस्वी सलामी जोडी आहे. पण त्यातील धवन दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी सॅमसनला संधी देण्यात आली आहे. या संघात लोकेश राहुलचा समावेश आहे. धवनच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून नवख्या सॅमसनपेक्षा अनुभवी लोकेश राहुल पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे हे फलंदाज आहेत. यातील रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे हे तीन अष्टपैलू खेळाडू संघात असणे भारतासाठी अधिक चांगले आहे. कारण तसे झाल्यास भारताला एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज संघात समाविष्ट करण्याची संधी मिळते.

नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या टी २० मालिकेत संजू सॅमसन याला १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे अखेर संजू सॅमसन टी २० मध्ये पदार्पण करणार असे वाटत होते. पण भारतीय संघात संजू सॅमसनला केवळ बाकावरच वाट पहावी लागली. संघाने पहिला टी २० सामना गमावला असूनही बदल झालेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूला पर्याय म्हणून बदली खेळाडू सॅमसनला मैदानावर उतरण्याची संधी मिळणार का? अशी चर्चा सध्या क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi india vs windies sanju samson included in team india t20 squad but will he get chance in playing xi vjb
First published on: 27-11-2019 at 15:56 IST