Shubman Gill Record: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने दमदार सुरूवात केली आहे. भारतीय संघाकडून कर्णधार शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुलने शतक झळकावलं. दरम्यान अर्धशतकी खेळी करणाऱ्या शुबमन गिलच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
शुबमन गिलच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना गिलला चांगली सुरूवात मिळाली होती. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर असं वाटलं होतं की, तो अर्धशतकाचं शतकात रूपांतर करू शकतो. पण अर्धशतक पूर्ण करताच त्याने पॅव्हेलियनची वाट धरली. मात्र, या खेळीदरम्यान त्याने असा काही पराक्रम करून दाखवला आहे जो विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनीलाही करता आलेला नाही. या तिन्ही कर्णधारांना कसोटी कर्णधार म्हणून मायदेशात खेळताना पहिल्याच डावात अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. याआधी सुनील गावसकरांनी हा पराक्रम केला होता. सुनील गावसकरांनी १९७८ मध्ये फलंदाजी करताना वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात २०५ धावांची खेळी केली होती.
गिलचे ३०० चौकार
यासह शुबमन गिलच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. गिलने पहिल्या दिवशी नाबाद परतला होता. तर दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना त्याने पहिल्या सत्रात सावध सुरूवात केली.पहिल्याच सत्रात त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने ५ चौकार मारले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ३०० चौकार पूर्ण केले आहेत.
केएल राहुलचं शतक
केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी मिळून शतकी भागीदारी केली. गिलला शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ५० धावांवर माघारी परतला. मात्र केएल राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने १९४ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक ठरले आहे. या ११ पैकी ९ शतकं ही त्याने मायदेशात खेळताना झळकावली आहेत. तर २ शतक मायदेशात खेळताना झळकावली आहेत. २०१६ मध्ये त्याने इंग्लंडविरूद्ध खेळताना शतक झळकावलं होतं. आता ९ वर्षांनंतर त्याने मायदेशात दुसरं शतक झळकावलं आहे.