तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज

चट्टोग्राम : खेळाडूंच्या दुखापती आणि तंदुरुस्तीच्या समस्यांना मागे सोडत भारतीय संघाचे शनिवारी तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकून बांगलादेशला मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यापासून रोखण्याचे लक्ष्य असेल. मेहदी हसन मिराजने केलेल्या दोन निर्णायक खेळींच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या दोन सामन्यांत विजय नोंदवले आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत ऐतिहासिक निर्भेळ यश संपादन करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल.

खेळाडूंच्या दुखापतींचे आव्हान

या मालिकेच्या सुरुवातीला भारताकडे २० खेळाडू उपलब्ध होते. मात्र, आठवडय़ाभरात परिस्थिती बदलली आणि आता अखेरच्या सामन्याकरता भारताकडे केवळ १४ तंदुरुस्त खेळाडू आहेत. त्यामुळे ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवला तात्काळ बांगलादेशला पाठवण्यात आले आहे.

किशन, त्रिपाठी की पाटीदार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितच्या अनुपस्थितीत कार्यवाहक कर्णधार केएल राहुल सलामीला येतो की इशान किशनला सलामीला संधी दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच विराट कोहली आणि शिखर धवन यांनाच सलामीला खेळवण्याचा भारताकडे पर्याय आहे. तसे झाल्यास मधल्या फळीत राहुल त्रिपाठीला किंवा रजत पाटीदार यांना पदार्पणाची संधी मिळू शकेल. मात्र, भारताला विजय मिळवायचा झाल्यास कोहली, शिखर आणि केएल राहुलला चांगली कामगिरी करावी लागेल. भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदार मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर असेल.

  • वेळ : सकाळी ११.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन ३, ५