नवी दिल्ली : आगामी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज, मंगळवारी निवड केली जाणार असून कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. केवळ १५ स्थानांसाठी जवळपास ३० खेळाडूंचे पर्याय उपलब्ध असल्याने संघनिवड करताना अजित आगरकर यांच्या समितीचीच कसोटी लागणार आहे. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असून संघबांधणीच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा निर्णायक ठरू शकेल.

आशिया चषक स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. भारतीय संघाने गतवर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तारांकितांनी क्रिकेटच्या लघुत्तम प्रारूपातून निवृत्ती घेतली. त्यानंतर नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आली आणि अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन यांसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली.

या खेळाडूंनी संधीचे सोने केल्याने भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांसारख्या संघांविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत यश मिळवले. त्यामुळे आता आशिया चषकासाठीही याच खेळाडूंवर विश्वास दाखवायचा की ‘आयपीएल’, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी ठरत असलेल्या शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या खेळाडूंना संघात समाविष्ट करायचे, हा अवघड निर्णय निवड समितीला घ्यावा लागणार आहे.

श्रेयस जवळपास दोन वर्षांपासून ट्वेन्टी-२० संघातून बाहेर आहे, तर गिलने अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना गेल्या वर्षी जुलैमध्ये खेळला होता. मात्र, या वर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये या दोघांनीही धावांचा रतीब उभारला. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गिल (१५ सामन्यांत ६५०) आणि श्रेयस (१७ सामन्यांत ६०४) अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या स्थानावर होते. तसेच काही महिन्यांपूर्वी अमिराती येथेच झालेल्या चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेत श्रेयसने चमकदार कामगिरी केली होती. दुसरीकडे, गिलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनेक विक्रम रचले. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० संघासाठीही या दोघांचा विचार करणे निवड समितीला भाग पडले आहे.

अमिराती येथील संथ खेळपट्ट्यांचा विचार करता निवड समिती फिरकीपटूंना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांचे स्थान निश्चित मानले जात असून कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी दोघांना संधी दिली जाऊ शकेल. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आपली उपलब्धता कळवल्याने त्याची निवडही अपेक्षित आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला संधी मिळते का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

श्रेयसचे पारडे जड…

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गिलच्या तुलनेत श्रेयसच्या पुनरागमनाची शक्यता अधिक आहे. आशिया चषकासाठी गिलला संघात स्थान दिले, तर त्याला अंतिम ११ मध्ये घ्यावेच लागेल. त्याला मैदानाबाहेर बसवून ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीची धारणा आहे. त्यातच आशिया चषक स्पर्धा २८ सप्टेंबरला संपणार असून भारतीय संघ मायदेशात २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे आशिया चषकात खेळल्यास गिलला विश्रांती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकणार नाही. श्रेयस सध्या कसोटी संघाचा भाग नसल्याने त्याला ट्वेन्टी-२० संघात प्राधान्य मिळू शकेल.

कोणत्या जागेसाठी कोण दावेदार?

फलंदाज : सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ऋतुराज गायकवाड

यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा, केएल राहुल, इशान किशन अष्टपैलू : हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, रियान पराग गोलंदाज : जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवी बिश्नोई —