पीटीआय, बंगळूरु : कर्णधार सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-० असा मोठा विजय मिळवला. भारताची स्पर्धेतील ही अपेक्षित सुरुवात ठरली. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडच्या सहा सामन्यांत मिळवलेला हा पाचवा विजय ठरला.

प्रवासाने थकलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना भारताच्या नियोजनबद्ध खेळाला उत्तरच देता आले नाही. सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी आपला अनुभव आणि सातत्याचे सुरेख प्रदर्शन करताना पूर्ण वर्चस्व राखले. पाकिस्तानने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या आगमनाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडले. आंतरखंडीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी लेबननविरुद्ध केलेल्या खेळाची छेत्रीने आपल्या घरच्या मैदानावर पुनरावृत्ती केली. सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला छेत्रीने मैदानी गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर सहा मिनिटांनी मिळालेल्या पेनल्टीवर छेत्रीने भारताची आघाडी वाढवली. पाकिस्तानने त्यानंतर भक्कम बचाव करून भारताची आघाडी मध्यंतरापर्यंत आणखी वाढू दिली नाही.

उत्तरार्धात भारताचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला ‘थ्रो-ईन’ करण्यापासून रोखण्याचा अनावश्यक प्रयत्न केला आणि परिणामी पंचांनी भारतीय प्रशिक्षकांना लाल कार्ड दाखवून मैदानातून बाहेर काढले. मात्र, याचा भारतीय खेळाडूंच्या खेळावर परिणाम झाला नाही. अधिक गोल करण्याच्या उद्देशाने त्यांनी आक्रमणातील वेग वाढवला आणि ७४व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर छेत्रीने कोणतीही चूक केली नाही. मग उदांता सिंगने ८१व्या मिनिटाला गोल करून भारताचा चौथा गोल करत मोठा विजय निश्चित केला. मुसळधार पावसातही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी २२,८६० प्रेक्षकांची मैदानात उपस्थिती होती. भारताचा दुसरा सामना शनिवारी नेपाळशी होणार आहे. त्यापूर्वी, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळवर ३-१ असा विजय मिळवला.

सामन्याच्या केवळ सहा तासांपूर्वी पाकिस्तानी खेळाडू भारतात

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतरही तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे पाकिस्तानी फुटबॉल संघातील खेळाडू टप्प्याटप्प्याने भारतात दाखल झाले. भारताविरुद्धच्या सामन्याला केवळ सहा तास शिल्लक असताना पाकिस्तानी संघ बंगळूरुला पोहोचला. पाकिस्तानचा ३२ सदस्यीय संघ कराचीहून मॉरिशसमार्गे मध्यरात्री १ वाजता मुंबईत दाखल झाला. त्यानंतर तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे दोन टप्प्यात पाकिस्तानी खेळाडूंना सामना केंद्रावर जावे लागले. प्रथम पहाटे ४ वाजता आणि नंतर सकाळी ९.१५ वाजता अशा दोन टप्प्यात पाकिस्तानचा संघ बंगळूरुमध्ये पोहोचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशियातून सर्वाधिक गोल करणाऱ्यांत छेत्री दुसरा

छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियातून सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. छेत्रीचे आता ९० गोल झाले असून, सर्वाधिक १०९ गोल इराणच्या अली दाईच्या नावावर आहेत. छेत्रीने मलेशियाच्या मुख्तार दहारीला (८९ गोल) मागे सोडले.