दुखापतीमधून सावरलेले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि हर्ष पटेल यांचे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघामध्ये पुनरागमन झालं आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात कोणताही मोठा बदल निवड समितीने केलेला नाही. मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. शमीला राखीव खेळाडू ठेवण्याचा निर्णय अनेकांना खटकला असला तरी यामागील खरं कारण समोर आलं आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये यंदा टी-२० विश्वचषक होणार असल्याने तेथील परिस्थितीशी जुळवून घेणं आणि मैदानांचा विचार करता शमीला पहिल्या १५ खेळाडूंमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शमीचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच अव्वल १५ पैकी एखाद्या वेगवान गोलंदाजाला काही दुखापत झाली तरच शमीला खेळण्याची संधी मिळू शकते. शमीला मुख्य संघातून वगळणं हा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या योजनेचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.

इनसाइडस्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी फिरकी गोलंदाजांना प्राधान्य दिलं. वेगवेगळी शैली असणारे फिरकी गोलंदाज प्रमुख संघात हवे असं या दोघांचं मत होतं. त्यामुळेच शमीला मूळ संघामध्ये जागा मिळू शकली नाही. निवड समितीने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी चार वेगवान गोलंदाजांना निवडलं आहे. यामध्ये पुनरागमन करणारे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या दोघांचा समावेश आहे. भुवनेश्वस कुमारचं नाव अंतिम संघात असेल असं निश्चित मानलं जात होतं. आशिया चषक स्पर्धेमध्ये अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करताना काही चूका झाल्याने चर्चेत असणाऱ्या अर्शदीप सिंगला अनुभव नसतानाही संघात स्थान देण्यात आलं आहे. गरज वाटल्यास अष्टपैलू खेळाडू असणारा हार्दिक पंड्याही वेगवान गोलंदाजी करु शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा आणि द्रविड यांच्या मतानुसार ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होत असल्याने त्यावेळी तिथे उष्ण वातावरण असतं आणि खेळपट्टी कोरडी असते. याच कारणामुळे तिथे फिरकी गोलंदाजांना अधिक यश मिळेल अशी शक्यता आहे. म्हणूनच फिरकी गोलंदाजांमध्ये वैविध्य असेल तर संघ निवड अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल असं मत दोघांनी मांडलं. निवड समितीसोबतच्या बैठकीशी संबंधित सुत्रांनी इनसाइडस्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार शमी आणि आर. अश्विनच्या नावावरुन निवडकर्त्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. द्रविड आणि रोहित शर्मा या दोघांनी अश्विनला प्राधान्य दिलं. दोघांनीही अश्विन संघात हवं असं सांगितलं. त्यामुळेच निवडकर्त्यांना दोघांचं म्हणणं ऐकावं लागलं. अश्विनला ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे.