दुबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची बुधवार किंवा गुरुवारी निवड होणार असून अनुभवी फलंदाज करुण नायरच्या स्थानाबाबत सर्वाधिक चर्चा अपेक्षित आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे अहमदाबाद (२ ते ६ ऑक्टोबर) आणि नवी दिल्ली (१० ते १४ ऑक्टोबर) येथे होणार आहेत.

करुणने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळपट्टीवर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने चार कसोटी सामन्यांत मिळून केवळ एक अर्धशतक केले. त्यामुळे आता त्याचे स्थान धोक्यात आले असून अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती अन्य पर्यायांचा विचार करण्याची शक्यता आहे. करुणला देवदत्त पडिक्कलशी स्पर्धा करावी लागू शकेल. पडिक्कल आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याने नुकतेच ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध शतकही साकारले. तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा अष्टपैलू खेळाडूंकडे कल असतो. अशात नितीश कुमार रेड्डीलाही पसंती मिळू शकते.

आशिया चषक स्पर्धेच्या सांगतेनंतर चारच दिवसांनी कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघ अक्षर पटेलच्या रूपात अतिरिक्त फिरकीपटूला प्राधान्य देऊ शकेल. तसेच ऋषभ पंतही पायाच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्याने या मालिकेत खेळणार नाही.

संभाव्य संघ (१५ सदस्य) : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर/देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नारायण जगदीश (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, आकाश दीप.

‘अ’ संघांतील सामन्यास श्रेयस मुकणार?

लखनऊ : भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांतील दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्याला आज, मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. कर्णधार श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्यास मुकणे अपेक्षित असून त्याच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल नेतृत्वाची धुरा सांभाळेल. तसेच केएल राहुल आणि मोहम्मद सिराज हे आघाडीचे कसोटीपटूही या सामन्यात खेळणार आहेत. श्रेयसने स्वत:हून विश्रांती मागून घेतल्याचे समजते.