२२ धावांवर चार गडी बाद अशी घसरगुंडी उडालेल्या भारतीय डावाला आकार देत कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात नाबाद १२१ धावांची दिमाखदार खेळी साकारली. ट्वेन्टी-२० प्रकारातलं रोहितचं हे पाचवं शतक आहे. रोहित शर्माच्या या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर भारताने २१२ धावांची मजल मारली. बंगळुरूचं छोटेखानी मैदान आणि अफगाणिस्तानची अनुनभवी गोलंदाजी यांचा पुरेपूर फायदा उचलत रोहितने ११ चौकार आणि आठ षटकारांसह ही खेळी सजवली.

मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि अवेश खान यांना अंतिम अकरा जणांच्या संघात संधी दिली. तिसऱ्या षटकात फरीद अहमदने उत्तम फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालला ४ धावांवर बाद केलं. आयपीएल स्पर्धेतील आरसीबी स्पर्धेचं मैदान असल्यामुळे विराट कोहलीकडून या सामन्यात प्रचंड अपेक्षा होत्या. पण कोहली पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. कोहली बाद झाला आणि मैदानात स्मशानशांतता पसरली.

पुढच्याच षटकात शिवम दुबेही तंबूत परतला. त्याला केवळ एका धाव करता आली. संजू सॅमसनला फरीदनेच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यालाही खातं उघडता आलं नाही. चार बाद २२ अशी अवस्था झालेल्या स्थितीतून संघाला बाहेर काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला रिंकू सिंगची साथ मिळाली. रोहितच्या आक्रमक पवित्र्यामुळे रिंकूने बचावात्मक पवित्रा खेळ करत त्याला साथ दिली. या जोडीने सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर देत डावाची पडझड थांबवली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहितने भात्यातल्या फटक्यांची पोतडी उघडत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अझमतुल्ला ओमरझाइच्या चौथ्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर चौकार खेचत रोहितने या प्रकारातल्या पाचव्या शतकाला गवसणी घातली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित-रिंकूची नाबाद भागीदारी

रोहित-रिंकू जोडीने पाचव्या विकेटसाठी ९५ चेंडूत १९० धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारली. रिंकूने कर्णधाराला तोलामोलाची साथ देत ३९ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी साकारली. त्याने २ चौकार आणि ६ षटकार लगावले. करिम जनतने टाकलेल्या २० व्या षटकात रोहित-रिंकूने तब्बल ३६ धावा चोपून काढल्या. या जोडीने ट्वेन्टी-२० प्रकारात एका षटकात सर्वाधिक धावांच्या युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी केली. २००७ च्या टी-२० विश्वचषकात युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ षटकारांसह ३६ धावा वसूल केल्या होत्या. तर अखिल धनंजयच्या गोलंदाजीवर कायरन पोलार्डने ३६ धावा कुटल्या होत्या. रोहित-रिंकूने जोडीने करीम जनतच्या गोलंदाजीवर जोरदार टोलेबाजी केली. या सगळ्या धुमश्चक्रीत फरीद अहमदने चार षटकात २० धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स पटकावल्या.