भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ट्वेन्टी-२० सामना आज, गुरुवारी करारा येथे खेळवला जाणार असून, या वेळी पाहुण्यांना पाच सामन्यांच्या या मालिकेत आघाडी मिळविण्याची सुवर्णसंधी असेल. यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने याच महिन्यात सुरू होणाऱ्या ॲशेस मालिकेच्या अनुषंगाने वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांना भारताविरुद्ध उर्वरित दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी विश्रांती दिली आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही थोडी कमकुवत झाली असून याचा फायदा घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सरशी साधली. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन करत विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात हेझलवूडने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांची कसोटी पाहिली होती. मात्र, त्यानंतर त्याला उर्वरित मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात फलंदाजांनी १८० हून अधिकची धावसंख्या उभारून देऊनही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्या रोखता आल्या नाहीत. भारताच्या सर्वच फलंदाजांनी छोटेखानी, पण महत्त्वाचे योगदान देत सामन्यात बाजी मारली.

होबार्ट येथील सामन्यात भारताने तीन बदल करताना अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा यांना संधी दिली. या तिघांनीही चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीपने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर वॉशिंग्टनने २३ चेंडूंत नाबाद ४९ धावा आणि जितेशने १३ चेंडूंत नाबाद २२ धावा फटकावल्या. तसेच या सामन्यानंतर चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला प्रथमश्रेणी सामना खेळण्यासाठी मायदेशी पाठविण्यात आले. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल अपेक्षित नाही.

दुसरीकडे, हेझलवूड आणि हेडच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचा कस लागणार नाही. गेल्या सामन्यात त्यांना हेझलवूडची विशेष उणीव जाणवली. वेगवान गोलंदाज शॉन ॲबटला संधी मिळाली, पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याच्या जागी बेन ड्वारशस किंवा माहली बिअर्डमन यांच्यापैकी एका वेगवान गोलंदाजाला खेळविण्याबाबत ऑस्ट्रेलिया विचार करू शकेल.

वेळ : दुपारी १.४५ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

उपकर्णधार गिलवर दडपण

गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी सातत्याने सलामीला खेळत होती. मात्र, आशिया चषकापूर्वी अचानक यात बदल करण्यात आला आणि अभिषेकच्या साथीने शुभमन गिलला सलामीला खेळविण्यात आले. विशेष म्हणजे, गिलवर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. मात्र, त्याला अद्याप ट्वेन्टी-२० संघातील आपले महत्त्व अद्याप सिद्ध करता आलेले नाही. गेल्या १३ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० डावांत त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. तसेच सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिका आणि ट्वेन्टी-२० मालिकेच्या सहा डावांत मिळून त्याने अनुक्रमे १०, ९, २४, नाबाद ३७, ५ आणि १५ धावा अशी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे आता कामगिरी उंचावण्यासाठी त्याच्यावर दडपण आहे.

मार्श, डेव्हिडवर भिस्त

हेझलवूड आणि हेड हे उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने ऑस्ट्रेलियाला अनुभवाची कमतरता जाणवणार आहे. अशा वेळी कर्णधार मिचेल मार्श आणि तडाखेबंद फलंदाज टीम डेव्हिड यांना कामगिरी अधिक उंचवावी लागणार आहे. हेडच्या अनुपस्थितीत मार्शच्या साथीने मॅथ्यू शॉर्ट सलामीला खेळू शकेल. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल ओवेन आणि जोश इंग्लिस यांचाही पर्याय उपलब्ध आहे. तसेच हाताच्या दुखापतीमुळे गेल्या काही काळापासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असलेल्या ग्लेन मॅक्सवेलचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन होऊ शकेल. तसे झाल्यास मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस यांच्यावर अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याची जबाबदारी असेल.

संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, नितीश रेड्डी, हर्षित राणा.

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश फिलिपे (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, शॉन ॲबट, झेवियर बार्टलेट, नेथन एलिस, मॅथ्यू कुनमन, ॲडम झॅम्पा, ग्लेन मॅक्सवेल, महाली बिअर्डमन.