सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणखी एका ट्वेन्टी-२० मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, त्यांच्या फलंदाजांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली आहे. आता आज, शनिवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय फलंदाज कामगिरी उंचावणार का, याकडेच चाहत्यांचे लक्ष असेल.

अष्टपैलू खेळाडू व गोलंदाजांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यांत बाजी मारली आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही हे सुनिश्चित झाले आहे. मात्र, आता ऐतिहासिक ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड अर्थात गॅबावरील अखेरचा सामना जिंकून ट्वेन्टी-२० मालिका विजयासह ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.

भारताच्या फलंदाजांना या मालिकेत फारशी चमक दाखवता आलेली नाही. चार सामन्यांत मिळून भारताकडून केवळ एका फलंदाजाने अर्धशतक साकारले आहे. सलामीवीर अभिषेक शर्माने मेलबर्न येथील दुसऱ्या सामन्यात ३७ चेंडूंत ६८ धावा फटकावल्या. मात्र, याव्यतिरिक्त तो चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकलेला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल झगडताना दिसत आहेत. गेल्या सामन्यात करारा येथील आव्हानात्मक खेळपट्टीवर गिलने दीर्घकाळ फलंदाजी केली. मात्र, त्याला ३९ चेंडूंत ४६ धावाच करता आल्या. त्याच्यावरील दडपण वाढत आहे.

गोलंदाजी ही भारतासाठी जमेची बाजू ठरत आहे. विशेषत: अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती हे फिरकीपटूंचे त्रिकुट ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकण्यात यशस्वी ठरत आहे. आता अशीच कामगिरी सुरू ठेवत भारताला मालिका जिंकवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

तिलक कामगिरी उंचावणार?

आशिया चषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध निर्णायक अर्धशतक साकारल्यानंतर डावखुरा फलंदाज तिलक वर्माकडून अपेक्षा वाढल्या. मात्र, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अद्याप लय सापडलेली नाही. तीन डावांत तो अनुक्रमे ०, २९ आणि ५ धावाच करू शकला आहे. त्यामुळे आता कामगिरी उंचावण्याचा त्याचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने गेल्या सामन्यात शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग अपयशी ठरला. त्यामुळे आजच्या सामन्यात सूर्यकुमार किंवा तिलक यांच्यापैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणे अपेक्षित आहे.

● वेळ : दुपारी १.४५ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.