वृत्तसंस्था, लीड्स
नवा कर्णधार, दिग्गजांच्या निवृत्तीनंतर युवाशक्तीवर मदार आणि त्यांना काही अनुभवी शिलेदारांची साथ या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ आज, शुक्रवारपासून यजमान इंग्लंडविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेटच्या ‘गिल’पर्वाची ही सुरुवात ठरेल.
भारतीय संघाने इंग्लंडमधील पहिलावहिला कसोटी सामना जून १९३२ मध्ये खेळला होता. त्यानंतरच्या ९३ वर्षांत केवळ अजित वाडेकर (१९७१), कपिल देव (१९८६) आणि राहुल द्रविड (२००७) या तिघांनाच कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे. या यादीत स्थान मिळविण्यासाठी शुभमन गिल उत्सुक आहे. मात्र, यशाचा मार्ग खडतर असेल याची गिलला कल्पना आहे. त्याला प्रथमच कसोटी संघाची धुरा सांभाळताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी त्रिकुटाविना खेळावे लागणार आहे. त्यामुळे स्वत:मधील नेतृत्वगुण सिद्ध करतानाच सहकाऱ्यांकडूनही सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचे आव्हान २५ वर्षीय गिलसमोर असेल.
ब्रेंडन मॅककलमचे मार्गदर्शन आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेट खेळण्याची शैली पूर्णपणे बदलून टाकली आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्याच्या या शैलीला ‘बॅझबॉल’ असे नाव मिळाले. ही शैली काही वेळा यशस्वी ठरली, तर काही वेळा आक्रमकतेसह आलेल्या बेजबाबदारपणाने इंग्लंड संघाचा घात केला. मात्र, त्यांच्या शैलीत बदल होण्याची शक्यता कमीच असून इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना आणि कर्णधार गिलला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करतील. गिल संयम राखून योग्य निर्णय घेतो का, हे या मालिकेचा निकाल ठरविण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकेल.
तिसऱ्या क्रमांकाचे कोडेच
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला खेळणार हे निश्चित आहे. कर्णधार गिल चौथ्या, तर उपकर्णधार ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळणार असल्याचे स्वत: पंतने सांगितले. मात्र, त्याच्या सांगण्यानुसार तिसऱ्या क्रमांकाचे कोडे कायम आहे. या शर्यतीत साई सुदर्शन आघाडीवर असला, तरी खेळपट्टी पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी आणि शार्दूल ठाकूर या तीनपैकी दोन अष्टपैलूंना खेळविण्याचा निर्णय झाल्यास सुदर्शनचे पदार्पण लांबणीवर पडू शकेल. या परिस्थितीत करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. मात्र, अतिरिक्त फलंदाज खेळविण्याचे ठरल्यास सुदर्शन आणि करुण या दोघांनाही संघात स्थान मिळेल.
लीड्स येथे पुढील पाचही दिवस उष्ण आणि कोरडे वातावरण राहील असा अंदाज आहे. खेळपट्टीवर आठ मिलिमीटर गवत असले, तरी केवळ पहिल्या दिवशी गोलंदाजांना मदत मिळेल असे ‘क्युरेटर’ रिचर्ड रॉबिन्सन म्हणाले. अन्य चार दिवस फलंदाज वर्चस्व गाजवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अनुभवी खेळाडूंवर जबाबदारी
विराट आणि रोहितच्या निवृत्तीमुळे इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि साई सुदर्शन या युवकांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, त्यांना केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि पुनरागमनवीर करुण नायर या अनुभवी खेळाडूंची साथ गरजेची आहे. एकीकडे इंग्लंड संघात १३ हजारांहून अधिक कसोटी धावा आणि ३६ शतकांचा मानकरी जो रूटचा समावेश आहे. तर दुसरीकडे सध्याच्या भारतीय संघात सर्वाधिक कसोटी धावा राहुलच्या (५८ सामन्यांत ३२५७) नावे आहेत. यावरून भारतीय फलंदाजीतील अनुभवाची कमतरता अधोरेखित होते. गोलंदाजीत जसप्रीत बुमरावरच भारताची मदार असेल. बुमरा या मालिकेतील केवळ तीन सामन्यांसाठी उपलब्ध असेल. तो पहिला सामना खेळणार हे निश्चित आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे हेच इंग्लंडसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्याच्यासह प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणे अपेक्षित आहे.
इंग्लंडला गोलंदाजीची चिंता
इंग्लंडने फलंदाजीत बदल केलेले नाहीत. बेन डकेट, रूट आणि हॅरी ब्रूक यांसारखे फलंदाज लयीत असून सलामीवीर झॅक क्रॉली आक्रमक सुरुवात करून देण्यात सक्षम आहे. ऑली पोपचेही स्थान कायम आहे. त्याने गेल्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध शतक केले होते. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यासाठी त्याच्यावर दडपण आहे. कर्णधार बेन स्टोक्स कितपत गोलंदाजी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंग्लंडसाठी गोलंदाजी हाच चिंतेचा विषय आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या निवृत्तीमुळे इंग्लंडची गोलंदाजी सध्या कमकुवत दिसत आहे. ख्रिास वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि फिरकीपटू शोएब बशीर हे गोलंदाज पहिल्या कसोटीत खेळतील.
कोणत्याही खेळाडूसाठी कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्व करण्यापेक्षा मोठा मान असू शकत नाही. ही खूप मोठी जबाबदारी असल्याचेही मी जाणतो. ‘आयपीएल’दरम्यान मी रोहित आणि विराटभाईची भेट घेऊन कर्णधारपदाबाबत चर्चा केली होती. त्यांचे इंग्लंडमधील अनुभव मी जाणून घेतले. याचा मला फायदा मिळू शकेल. आता संघ म्हणून आम्ही केवळ सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही कोणत्याही ओझाविना या मालिकेत खेळणार आहोत. अनुभवाच्या कमतरतेची आम्हाला चिंता नाही. – शुभमन गिल