भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद ६९ धावा केल्या असून त्यांच्याकडे आता ३३२ धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी एजाजच्या या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आणला. रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. भारताने फॉलोऑन न देता आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे.

भारताचा दुसरा डाव

क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यामुळे शुबमन गिलऐवजी चेतेश्वर पुजाराने मयंक अग्रवालसोबत सलामी दिली. या दोघांनी चांगली सलामी देत अर्धशतकी भागीदारी रचली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने २१ षटकात बिनबाद ६९ धावा केल्या. पुजारा २९ तर अग्रवाल ३८ धावांवर नाबाद आहे.

न्यूझीलंडचा पहिला डाव

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भन्नाट गोलंदाजी करत न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळवून दिली नाही. त्याने कप्तान टॉम लॅथम (१०), विल यंग (४) आणि रॉस टेलर (१) यांना बाद करत तीन धक्के दिले. सिराजने टेलरची दांडी गुल केली. त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (८) पायचीत पकडल न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. विराटने रवीचंद्रन अश्विनला चेंडू सोपवला आणि अश्विनने हेन्री निकोल्सची (७) दांडी गुल केली. अवघ्या ३१ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज बाद करण्यात भारताने जास्त वेळ गमावला नाही. अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने ८ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराजने ३ तर अक्षर पटेलने २ बळी घेतले. जयंत यादवला एक बळी मिळाला.

भारताचा पहिला डाव

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर चहापानापर्यंत भारताला अजून दोन धक्के बसले. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कप्तान विराट कोहली यांना एजाजनेच शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयंकने किल्ला लढवला. या दोघांनी संघाला दीडशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दरम्यान मयंकने आपले अर्धशतकही पूर्ण केले. एजाजने पुन्हा गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने श्रेयसला (१८) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर मयंकने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावसंख्या वाढवली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयंकने आपले शतक पूर्ण केले. मयंक-साहाने अर्धशतकी भागीदारी रचत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. दुसऱ्य़ा दिवशीही एजाजने दमदार सुरुवात करत प्रथम वृद्धिमान साहा (२७) त्यानंतर रवीचंद्रन अश्विनला (०) माघारी धाडले. सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर मयंकसोबत अक्षर पटेलने अर्धशतकी भागीदारी रचली. लंचनंतर एजाजने भारताला अजून दोन धक्के दिले. त्याने दीशतक ठोकलेल्या मयंकला आणि त्यानंतर अक्षरला बाद करत आपला आठवा बळी नोंदवला. मयंकने १७ चौकार आणि ४ षटकारांसह १५० तर अक्षरने ५ चौकार आणि एका षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर एजाजने जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांचा अडथळा यांचा अडथला दूर करत विक्रमी १० विकेट्स घेतले. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला. एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले.

हेही वाचा – IND vs NZ : एकच छावा..! ‘मुंबईकर’ एजाज पटेलनं भारताला गुंडाळलं; १० विकेट्स घेत कुंबळेसोबत मानाचं स्थान मिळवलं!

भारतीय संघात मोठे बदल

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.